पिंपरी (दिनांक : २३ जानेवारी २०२३) “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची कवचकुंडले बहाल केली त्यामुळे सामाजिक समरसता प्रस्थापित झाली!” असे विचार विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय समरसता विभागप्रमुख देवजीभाई रावत यांनी लेडी रमाबाई सभागृह, स. प. महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे येथे रविवार, दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी व्यक्त केले. विश्व हिंदू परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश सामाजिक समरसता विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय विद्वत संमेलनात बीजभाषण करताना देवजीभाई रावत बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळी पुणेचे अध्यक्ष ॲड. एस. के. जैन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतीश गोरडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत, ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रा. डॉ. रमेश पांडव, ह.भ.प. सुभाषमहाराज गेठे, माधवी सोनजी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. विश्व हिंदू परिषद प्रांतमंत्री प्रा. संजय मुदराळे यांनी प्रास्ताविक केले. उद्घाटनपर मनोगतातून ॲड. एस. के. जैन यांनी, “भारतीय संस्कृती निकृष्ट असून विद्वत्ता ही फक्त पाश्चात्यांकडे आहे, असे जाणीवपूर्वक बिंबवण्याचे षडयंत्र मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीच्या माध्यमातून केले गेले!” असे मत मांडले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रा. डॉ. श्यामा घोणसे लिखित ‘भारतीय संत आणि समरसता’ तसेच रमेश पतंगे लिखित ‘आपले संविधान’ या ग्रंथांचे लोकार्पण करण्यात आले.
देवजीभाई रावत आपल्या बीजभाषणात पुढे म्हणाले की, “संविधानाच्या अंमलबजावणीमुळे जातपात, लिंगभेद आणि अस्पृश्यतेच्या शृंखला गळून पडल्या. शोषणमुक्ती अन् धार्मिकस्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त झाला. अर्थातच संविधान परिपूर्ण असले तरी ते राबविणारी यंत्रणा सक्षम हवी. बुद्धिजीवी वर्गाने देशविघातक प्रवृत्तींचा प्रतिवाद केला पाहिजे!” भारतमाता आणि समरसतेचे मानदंड असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन, एकात्मता मंत्राचे सामुदायिक उच्चारण करून संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी पांडुरंग राऊत यांचा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाची मानद डी.लिट. पदवी प्राप्त झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. निखिल कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले.