अप्रतिम मीडिया संस्थेतर्फे
जनमत घेऊन देण्यात येणारा विकास पत्रकारितेतील अत्यंत मानाचा असणारा राज्यस्तरीय
“चौथास्तंभ पुरस्कार ” मुंबईत मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर
मध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते एका शानदार सोहळ्यात न्यूज स्टोरी टुडे चे संपादक देवेंद्र भुजबळ यांना पत्रकार दिनी प्रदान करण्यात आला.
यावेळीही व्यासपिठावर
विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष श्री मंदार पारकर,
विशेष गौरवमूर्ती एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक श्री राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव श्री नंदकुमार, विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक
श्री अभिजीत पाटील,
अभिनेते श्री मंगेश देसाई, निमंत्रक रणजीत कक्कड उपस्थित होते.

या कार्यक्रमात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या जेष्ठ संपादक, पत्रकार यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्रतिम मीडिया चे संचालक डॉ अनिल फळे यांनी तर आभार प्रदर्शन निमंत्रक श्री विवेक देशपांडे यांनी केले.
यावेळी विविध मान्यवर,
पुरस्कारार्थिंचे कुटुंबीय,स्नेही, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज स्टोरी टुडे
आफ्टरनून, फ्री प्रेस जर्नल, डी एन ए (झी मीडिया), एशिएन एज (डेक्कन क्रोनिकल) या
मुंबईतील प्रतिष्ठित इंग्रजी वर्तमान पत्रांमध्ये व काही काळ टिव्ही 9 आदी ठिकाणी पत्रकार, सिनिअर कोरोस्पॉडंट म्हणून आपल्या पत्रकारितेचा ठसा उमटवलेल्या देवश्री
भुजबळ यांनी
कोरोनाच्या भयंकर काळात लोकांना धीर मिळावा, दिलासा मिळावा, योग्य माहिती मिळावी या साठी काळाची पावले व डिजिटल पत्रकारितेचे महत्व ओळखून न्यूज स्टोरी टुडे हे वेबपोर्टल सुरू केले. यासाठी तिने या माध्यमाचे स्वतः प्रशिक्षण घेतले.
गेल्या दोन वर्षांत या पोर्टलची लोकप्रियता सारखी वाढतच आहे. सध्या हे पोर्टल ८६ देशात पोहोचले असून ४ लाख ७६ हजाराहून अधिक याचे व्ह्युज आहेत. राजकारण, गुन्हेगारी, समाजातील भानगडी, चारित्र्य हनन असा काही मजकूर न देता विश्व बंधूत्व, देशप्रेम, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, नवे विचार, समाजकल्याण, क्रीडा, पर्यटन, यश कथा असाच मजकूर या पोर्टल वर असतो. त्यामुळे विशिष्ट अभिरुची, आवड असणारे देश विदेशातील लेखक, कवी, वाचक, विविध क्षेत्रातील व्यक्ती या पोर्टलशी जोडल्या गेले आहेत आणि जोडले जात आहेत.
निवृत्त माहिती संचालक तथा माजी दूरदर्शन निर्माते देवेंद्र भुजबळ हे या पोर्टलचे संपादन तर त्यांच्या सहचारिणी सौ अलका भुजबळ या पोर्टलची निर्मिती करीत
असतात.
या पुरस्कारा विषयी बोलताना श्री देवेंद्र भुजबळ यांनी “या वेबपोर्टलला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सर्व लेखक,कवी,विविध कारणांनी पोर्टल शी जोडल्या गेलेल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे जणू प्रतीकच आहे,”अशी भावना व्यक्त केली .