आज देशभरात कोरोनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. वाढती आकडेवारी चिंतेचा विषय होत चालली आहे. त्यातही या आकडेवारीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे.
भारतात आजपर्यंत 66 लाखाहून अधिक कोरोनाबाधित झाले आहेत. यातही एकट्या महाराष्ट्रात 14 लाखाहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झालेली आहे. महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे.
देशातील महाराष्ट्र हा कोरोना आकडेवारीत आघाडीवर असला तरी तेथील आरोग्यसुविधांत देखील देशात अव्वल असल्याचे दिलासादायक चित्र आहे.कोरोना उपचारासाठी आवश्यक औषधे, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, व्हेण्टिलेटर, आयसीयू सुविधा अशा सर्वच सुविधा महाराष्ट्रात इतर राज्यापेक्षा अधिक आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला मदत करताना हात आखडता घेतला असला तरी महाराष्ट्र खंबीरपणे कोरोनाशी लढा देत आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार देशात सध्या 15429 प्रकारच्या वैद्यकीय सुविधा आहेत. त्यापैकी सुमारे 21:49 टक्के म्हणजेच 3360 सुविधा महाराष्ट्रात आहेत. तसेच देशात विलगीकरणासाठीच्या खाटा एकूण 15 लाख 56 हजार 101 आहेत. समाधानाची बाब म्हणजे त्यापैकी 3 लाख 49 हजार 820 म्हणजे 22.48 टक्के खाटा महाराष्ट्रात आहेत.

देशात मध्यंतरी आरोग्यक्षेत्रात ऑक्सिजनचा तुडवडा मोठया प्रमाणात जाणवत होता. देशात ऑक्सिजनची सुविधा असलेल्या ओटू खाटांची एकूण संख्या 2 लाख 33 हजार 25 आहे. तर महाराष्ट्रातील संख्या आहे प्रमाण 56 हजार 603 म्हणजे 24.29 टक्के आहे. तसेच महाराष्ट्रा पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या तामिळनाडू राज्याकडे ओटू खाटांची संख्या 25 हजार 407 आहे. म्हणजेच महाराष्ट्राच्या अगदी निम्मीच आहे.
कोरोना काळात अत्यवस्थ रुग्णांसाठी आयसीयू खाटा अतिशय महत्वाच्या असतात. आपल्या देशात आयसीयू खाटांची संख्या 63 हजार 526 इतकी आहे. त्यापैकी आपल्या राज्यात या आयसीयू खाटांची उपलब्धता 14 हजार 834 इतकी आहे. सध्याची स्थिती पाहता वाढत्या रुग्णसंख्येसाठी ती नक्कीच अपुरी आहे. परंतु हे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आणि समाधानकारक आहे.
व्हेंटिलेटर सारख्या महत्वाच्या आरोग्य सुविधेचा विचार करायचा झाल्यास देशात व्हेंटिलेटर संख्या 32 हजार 450 इतकी आहे. यात महाराष्ट्रात राज्याच्या सरकारी, खासगी आरोग्य यंत्रणेने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत 6 हजार 924 व्हेंटिलेटर उपलब्ध केले आहेत. व्हेंटिलेटर्सचे देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रमाण 21.33 टक्के आहे.
म्हणजेच इथे व्हेंटिलेटर साठीही केंद्रांकडून पुरेशी मदत मिळाली नसताना देशातील सर्वाधिक उपलब्धता महाराष्ट्रात आहे.एन-९५ मास्क, पीपीई किट याबाबतही विचार करायचा झाल्यास महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा कणभर सरसच आहे.

अशा परिस्थितीत जर केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधीचा विचार केला तर महाराष्ट्राला योग्य न्याय मिळाला नसल्याचे दिसते. आज देशात सर्वाधिक कोरोनाबाधित आकडेवारी ही महाराष्ट्राची आहे.
भारतातील एकूण रुग्णसंख्येपैकी 21.87 टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रासाठी मोठा निधी उपलब्ध होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही.
केंद्राचा सर्वाधिक निधी हा तामिळनाडू राज्याला देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडू तुलना केल्यास तामिळनाडूच्या दुप्पट रुग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. परंतु तरीही त्यांना मिळालेला निधी हा महाराष्ट्राच्या तुलनेने अधिक आहे. निधीप्रमाणेच वैद्यकीय साधनसामग्री, यंत्रसामुग्रीतही महाराष्ट्राबाबत दुजाभाव झालेला दिसून येतो. मात्र अशा परिस्थितीतही महाराष्ट्र शासनाने उपलब्ध केलेल्या वैद्यकीय सेवासुविधा तूर्तास तरी इतर राज्यांच्या तुलनेत समाधानकारक आहेत.
मात्र असे असले तरी लोकसंख्या आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वैद्यकीय सेवा मुबलक नाहीत. त्यामुळे ज्या पद्धतीने राज्याने इतर राज्यापेक्षा सर्वाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तशाच पुढेही मोठया प्रमाणात वाढविण्यावर भर देणे गरजेचे आहे.
देशातील कोरोना आकडेवारी आणि उपलब्ध सुविधा या दोन्ही बाबीत महाराष्ट्र सध्या अग्रेसर आहे. वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी काळात राज्याने वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर दिल्यास कोरोनाविरोधी सक्षम आरोग्य यंत्रणा महाराष्ट्रात उभी राहील. परिणामी आगामी काळात आरोग्यविषयक कोणत्याही गंभीर समस्येशी दोनहात करण्यासाठी महाराष्ट्र खऱ्या अर्थाने खंबीर असेल हे मात्र नक्की.
- सागर ननावरे