नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे मार्चमध्ये घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउन नंतर शाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यानं देशभरात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आलं. मात्र, तरीही शाळा कधी सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच होता.
मात्र लॉकडाऊन 5 मध्ये विविध क्षेत्रात घातलेले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येऊ लागले आहेत. त्यात विद्यार्थ्यांच्या शालेय वर्षालाही तितकंच महत्त्वं देत केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. 15 ऑक्टोबरपासून देशातील शाळा टप्प्याटप्प्यानं सुरु होणार आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला मोठे आणि त्यानंतर लहान वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या एसओपीचा निर्णय हा त्या राज्यानं आणि केंद्रशासित प्रदेशानं ठरवणं अपेक्षित असेल.
महाराष्ट्रात देखील आगामी काही दिवसांत शाळा सुरु करण्याचे संकेत मिळत आहेत. यात 15 ऑक्टोबर पासून लगेच सुरुवात होणार नसली तरी नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्यात शाळा सुरु होणार आहेत. मात्र यासाठी मार्गदर्शक तत्वे आणि पुरेशी खबरदारी घेणे बंधनकारक असणार आहे.