संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग: १३१🚩 शिवरायांचा तिसरा डोळा : बहिर्जी नाईक

बहिर्जी नाईक हे एका रामोशाचं पोर होतं. कधी पोटाची खळगी भरायला तर कधी मित्रांना हसवायला, नकला करायला, रूप धारण करायला, तर कधी पोट भरण्यासाठी रानावनात शिकार करायला बहिर्जीना खूप आवडे . वाचकमित्रांनो, निसर्गासारखा गुरू नही आणि अनुभवासारखे शिक्षण नाही हे बहिर्जींबाबत लागू होते. 


               बहिर्जी नाईक हे लहानपणापासूनच खेळकर वृत्तीचे होते.  गावातील  बारा बलुतेदारांच्या घरी चाललेली कामे बहिर्जी करायचे. इतरांना काम करायला मदत करणे , कधी गावात येणारे गोसावी, नंदीवाले, बैरागी, मरीआई, खेळणीवाले, भिकारी, फकीर, भवानी जे कोणी येतील त्यांचे निरीक्षण करणे, त्यांचे आवाज काढणे,  त्यांचा पोषाख मनात साठवणे, लोकांचे गमतीदार भविष्य सांगणे हे बहिर्जीचे आवडते छंद होते. पण लोकांचे भविष्य सांगणाऱ्या बहिर्जीच्या भविष्यात काय लिहले होते ते कुणालाच ठाऊक नव्हते.  जर त्यावेळी बहीर्जीना कोणी म्हटले असते की तू शिवरायांच्या सैन्यात जाशील, शिवरायांचा एक दिवशी मित्र होशील तर बोलणार्‍याला बहिर्जीनी वेडात काढलं असतं.  काही बालकांकडे काही जन्मजात गुण असतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीचा प्रत्यय बहिर्जीबाबत दिसतो. 


                   मांसाहेब जिजाऊ व बालशिवबा पुण्यात राहायला आले. त्यावेळी लोक निर्मनुष्य पुण्यात राहायला घाबरत होते. सुलतानी -अस्मानी संकटांना घाबरून उजाड- भकास झालेल्या पुण्यात लांडगे, रानगवे आदी जंगली श्वापदांचा वावर वाढला होता. लोक पुण्यात राहायला यावे म्हणून मांसाहेब जिजाऊंनी पुण्यात लालमहाल बांधकामास सुरुवात केली. शेतीला उत्तेजन दिले तसेच जो कोणी पुण्यातल्या वा शेतातील उभ्या पिकांत- रानात उच्छाद मांडलेल्या माजलेला लांडगा मारून आणेल त्याला जिजाऊ आउसाहेब शिवरायांच्या हातून सोन्याचे कडं द्यायच्या.


                     बहिर्जी नाईकांना ही बातमी कळाली. लांडगा मारणं असो इतर कोणत्याही प्राण्याची शिकार असो हा बहिर्जी नाईक यांच्या डाव्या हाताचा खेळ होता. बहिर्जी रानात गेले आणि लांडगा मारून त्यांची शेपटी कापली. ती शेपटी घेऊन शिवनेरी किल्ला गाठला. शिवरायांना शेपटी दाखवायला उतावीळ झालेला बहिर्जी नाईक आऊसाहेबांना विचारू लागला, ” मांसाहेब, राजं कुठ हायेत ?  लांडगं मारून ही शक्ती आणलिया बघा.”


                      मांसाहेब म्हणाल्या ,” नाव काय तुझं ?”
                     ” बहिर्जी , रामोशांचा बहिर्जी मांसाहेब !” बहिर्जी उत्तरले.
                    “अरे , पण शिवबा बाहेर खेळायला गेलेत. दाखवलीच शेपटी ! आता जा कडं घेऊन !” मांसाहेब म्हणाल्या.
                       यांवर अधीर होत बहिर्जी म्हणाला ,” पण आऊसाहेब, एकदा मला शिवबांना भेटायचं हाये.”
                     मग मांसाहेब म्हणाल्या,” मग जा गावात. मित्रांबरोबर कुठे विटी- दांडू खेळत असतील ?”


                   मांसाहेबांना तरी कुठे माहीत होतं की ज्याप्रमाणे कृष्ण यमुनाकाठी बालगोपाळांना घेऊन बाललीला करत असे ; तसा आपला शिवकृष्ण बाल मावळ्यांना घेऊन गनिमांना ठेवण्याची बाललीला इतक्या लवकर खेळेल ?


                  बहिर्जी शिवरायांना शोधत-शोधत गावातून रानात आले. तेवढ्यात मोर ओरडल्याचा आवाज आला आणि लगेच पोरांचा गलका ऐकू येऊ लागला. बहिर्जी त्या आवाजाच्या दिशेने गेले. शिवाजीराजे व पोरं विटी दांडू खेळत होते.
                       बहिर्जी मोठयाने म्हणाले, ” तुमच्यात शिवाजीराजे कोण हायेत ?”
                   खेळ मधेच थांबवत शिवबा म्हणाले ,” मीच शिवबा, काय काम आहे ?”
                     ” तुमाला बघायचं होतं, मी लांडगं मारून आलोया. आईसाहेब कडं देत होत्या पण मी म्हणालो  मला शिवाजीराजांस्नी भेटायचं हाये तर त्या म्हणाल्यात गावात खेळायला गेलेत आणि पाहतोय तर तुमी सगळं रानात…… राजं, मी येऊ का तुमच्यात खेळाया ?” बहिर्जीने विचारले.
                   शिवबाने बहिर्जीना विचारले ,” तुला काय काय येतं ?”
                  ”  मला सगळं येतं . मी शिकार करतो, तलवार चालवतो, कुस्ती खेळतो आणि बर का भविष्यपण सांगतो !” बहिर्जी उत्तरले.
                  तेवढ्यात सगळी पोरं ओरडली, ” मग सांग बघू आमचं भविष्य !”
                   मग बहिर्जी सांगू लागला,” मी यायच्या आधी तुमी तलवार- तलवार खेळत होते. मी येताच मोर वरडला तो मोर नवता. तो झाडावर बसलेला एक पोरगा व्हता आणि तुमी लपवलेल्या तलवारी जाळीत हायेता.”
               ते ऐकून शिवराज थक्क झाले आणि विचारले,” काय रे नाव तुझं ?”
                ” मला बहिर्जी नाईक म्हणत्यात.” बहिर्जी म्हणाला.
                  ”  खरंच तू भविष्य जाणतो .” शिवरायांनी उत्सुकतेने विचारले.
                  त्यावर बहिर्जी हसून म्हणाले ,” राजं , त्यात काय अवघड ! अहो , आता वैशाखचा महिना ! या महिन्यात मोर वरडत नाही. मग मी वळखलं इथच पोरं असणार ? मी यायच्या अगुदर तुमी तलवारीचे डाव खेळत व्हतात. मी येताच तलवारीला लपवल्या. पण तुमच्या डोक्याला मुंडासं आहे की , मुंडासं बांधून कोण विटी दांडू खेळत का राजं ? मला पक्ष्यांचा आवाज भी काढता येतो. रानातला कोणता पक्षी- प्राणी कसा आणि कधी वरडतो हे आवाजावरून मी वळखतो.”


                     शिवराय खुश झाले आणि म्हणाले,” तू आजपासून आमचा मित्र !” राजांच्या तोंडून हे शब्द ऐकून बहिर्जी नाईक खुश होऊन म्हणाला,”  राजं, एक विनंती आहे या झाडावर बसलेल्या पोराला सांगा मोराचा आवाज काढू नगस म्हणा ! पावसाळ्यात मोर आणि उन्हाळ्यात पावश्या वरडतो.” ही बुद्धिमत्ता पाहून शिवाजी महाराज थक्क झाले.


                      शिवराय आता बहिर्जी नाईक बरोबर तलवारबाजी तर खेळतच होते पण आता रानातल्या वाटा -चोरवाटा, डोंगर चढणे- उतरणे असे खेळीही ते खेळू लागले. या सर्व खेळात पुढे असायचे ते बहिर्जी नाईक ! रानातून वाट कशी काढावी ? चुकले तर जागा कशी शोधावी ? अशी अनेक प्रकारची शिक्षणवजा माहिती बहिर्जी नाईकांना होती. म्हणूनच ते बालवयातच एखाद्या किल्ल्याची माहिती हातोहात काढून आणण्याचे काम करायचे. तेव्हापासून शिवाजी महाराज त्यांना “गुप्तहेर” असे म्हणायचे.


                 शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासून बहिर्जी नाईक यांच्या कार्याला सुरुवात झाली. सुरुवातीला जे जे किल्ले शिवाजी महाराजांनी घेतले त्याची सर्व माहिती बहिर्जी नाईकांनी पुरवली. इतकेच काय जावळीच्या पाडाव करण्याआधी जावळीची इत्यंभूत माहिती व मुरारबाजी सारखं सोनं जावळीत आहे आणि ते सोनं आपल्याजवळ हवं हे बहिर्जी नाईकांनी शिवरायांना सांगितल होतं.


                      बाजीप्रभूसारखे हिरे कृष्णाजी बांदलांकडून स्वराज्यात आणले ते  बहिर्जी नाईकांनीच !  ज्यावेळी अफजलखान स्वराज्यावर चालून आला त्यावेळी पंढरपूरपासून बहिर्जी अफजलखानाच्या सैन्यात होते. अफजलखान शिवाजी महाराजांचा घातच करायला आला आहे. याशिवाय अफजलखान येतांना आपल्या जनानखान्यातील सर्व बायका मारून आला आहे, तो छत्रपती शिवरायांना खूप घाबरला आहे याचा फायदा आपणास होईल ही माहिती काढणारे बहिर्जी नाईकच होते.


                    शाहिस्तेखानाच्या लाल महालात शिरण्यापूर्वी कारतलबखानास उंबरखिंडीत गाठण्याचा सल्ला बहिर्जीनीच दिला होता. छत्रपती शिवाजी महाराज लाल महालात शिरले तेव्हा शायिस्तेखानाच्या उठण्या- बसण्याच्या तपशिलासह सगळी माहिती बहिर्जी नाईकांनी दिली होती. म्हणून शिवरायांची शाहिस्तेखानावरील ” सर्जिकल स्ट्राईक” यशस्वी होण्यास मदत झाली होती. जसा श्रीशंकराच्या कपाळावर तिसरा डोळा होता आणि तो संकटसमयी उघडला जायचा. तसा शिवाजी महाराजांचा बहिर्जी तिसरा डोळा होता.


                     बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर खात्यात तीन ते चार हजार गुप्तहेर होते आणि या गुप्तहेर खात्याचे प्रमुख ” बहिर्जी नाईक” होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राभेटीपूर्वी औरंगजेब बादशाहासोबत पानविडा खाऊन आलेले बहिर्जीच होते. म्हणून शिवाजी महाराज नजरकैदेत असतांना ” शिवरायांचा दुसऱ्या ठिकाणी नेऊन वध करा” हा औरंगजेबाच्या आदेश बहिर्जींनी शिवाजी महाराजांना पोहोचला होता. परिणामी जलद हालचाली करून शिवाजी महाराज आग्र्याहून निसटले होते. शिवाजी महाराजांना आग्र्याला जातांना तीन महिने लागले होते पण येतांना ४० दिवसांत शिवाजी महाराज राजगडावर पोहचले होते. बैराग्याचा वेशाची कल्पनासुद्धा बहिर्जींनी शिवरायांना दिली होती. साक्षात मांसाहेब जिजाऊसुद्धा बैराग्याच्या वेषातील शिवरायांना ओळखू शकल्या नव्हत्या.


                     शिवराय पन्हाळगडावर सिद्दी जौहरच्या वेढ्यात सापडले तेव्हा पन्हाळ्याच्या वेढ्यातील माहिती काढण्यासाठी महादेव हेराला बैरागी म्हणून बहिर्जींनी पाठवले होते. सुरतेची लूट करतांना देवळे, मंदिरे, मशिदी, चर्च, आपले- परके आणि लुटायचे कोणाला हे नावानिशी शिवाजी महाराजांना बहिर्जी नाईकांनी कळवले होते. बैरागी, भिकारी बनण्यात बहिर्जी यांचा मोठा हातखंडा होता.


                    सुरत लुटतेवेळी सुरतेचा इंग्रज वखारवाला जॉर्ज हेन्री रेविंग्टन याच्या ऑफिसच्या दारात एक भिकारी एक महिनाभर भीक मागत होता. हा इंग्रज अधिकारी रोज त्याला एक नाणे द्यायचा. दररोजचा चेहरा पाहून हा भिकारी त्याच्या ओळखीचा झाला होता. शिवरायांनी सुरत लुटल्यानंतर हा भिकारीही गायब झाला. तद्नंतर जॉर्ज हेन्री रेविंग्टन हा इंग्रज अधिकारी शिवराज्याभिषेकासाठी रायगडावर आला. त्यावेळी एक चेहरा या अधिकाऱ्याला ओळखीचा वाटला. ज्यावेळी स्वराज्यासाठी बहुमोल कार्य करणाऱ्या एकेका स्वराज्यनिष्ठ मावळ्यांची नावे घेतली जात होती त्यावेळी हेन्री रेविंग्टन याच्या ओळखीच्या चेहऱ्याचे म्हणजेच यांचे बहिर्जीचे नाव घेतले गेले त्यावेळी इंग्रज अधिकारी जॉर्ज हेन्री रेविंग्टन यांनी कपाळाला हात लावला व पटकन खाली बसला. कारण एक महिना त्याच्या वखारीच्या दारात भीक मागणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो बहिर्जी नाईकच होता. याचे वर्णन त्यांनी आपल्या पत्रात करून ठेवले आहे. 


                  बहिर्जींनी शिवरायांची आग्र्यामध्ये व विजापूरकरांमध्ये देवसारखी प्रतिमा निर्माण केली होती. म्हणून आग्रा भेटीवेळी शिवरायांना पाहायला लोकांनी दुतर्फा गर्दी केली होती.  बहिर्जी यांनी आदिलशहाला आपल्या हाताने मदिरेचा ग्लास दिला होता आणि आवश्यक माहिती काढून आणली होती. बहिर्जी जसे सोंगे करण्यात माहीर होते तसेच ते अनेक भाषा बोलण्यातही चतूर होते. बिरबलासारखे चातुर्य बहिर्जीच्या ठायी होते. कधीकधी मृत्यूच्या दरवाजा ठोठावून शिवरायांसाठी बहिर्जी माहिती गोळा करायचे.


                    शिवरायांचा बालपणापासून ते मृत्यूपर्यंत स्वराज्य हेच आपले ध्येय मांडणारा हा वीर शेवटी शिवरायांच्या निधनानंतर कोलमडलाच. आयुष्यात महादेवाच्या जसा नंदी तसा शिवरायांचा नंदी म्हणून हात देणारा हा वाटाड्या शेवटी भूपाळगडावर लढतांना जखमी झाला. भूपाळगडाच्या पायथ्याशी येऊन श्रीशंकराच्या मंदिरात या शिवबाच्या नंदीने आपला प्राण सोडला. इतिहासात बहिर्जी नाईकबद्दल खूप त्रोटक माहिती आहे. पाहायला गेले तर बहिर्जी नाईक कुठे आणि राजमहालात जन्मलेले शिवराय कुठे ? पण नियतीने कशा गाठीभेटी घडवून आणल्या देवच जाणे !असे हे बहिर्जी नाईक ! ज्यांनी शस्त्र नाही पण बुद्धीचे अस्त्र चालवले आणि छत्रपती शिवरायांना मदत केली. बहिर्जी नाईक यांची समाधी सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात भूपाळगड  (बाणूरगड ) येथे आहे.

               लेखन: चंदन पवार

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close