संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग: १३०🚩 ” सरनोबत ” प्रतापराव गुजर

सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात भोसरी या गावी झाला. शेतकरी मराठा घरंदाज पाटील कुटुंबातील प्रतापराव गुजर लहानपणापासूनच काटक, निधड्या छातीचे, स्वकष्टी होते.


              तलवारबाजी, दांडपट्टा लाठी -काठी अशा शस्त्रविद्याबरोबरच कुस्तीतही प्रतापराव तरबेज होते. कर्तबगार गुजर घराण्यात प्रतापराव शोभून दिसत. आई-वडिलांनी त्यांचे नाव “कुडतोजी” असे ठेवले होते.


               निर्भीड स्वभाव, माणसे जोडण्याची कला, संघटन कौशल्य, धिप्पाड शरीरयष्टी अशा प्रतापरावांची समोरच्या माणसावर लगेच छाप पडत असे. पुढे  मावळ खोऱ्यात छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे कार्य सुरू केले. आदिलशाहीचे प्रदेश काबीज करायला सुरुवात केली. आदिलशहाची ठाणी, मुलुख ताब्यात घेतला. स्वराज्याचा संग्राम आदिलशाही प्रदेशापर्यंत पसरला. फलटणकर नाईक निंबाळकर यांच्या जहागिरी मुलखातून भोसरेकर प्रतापराव गुजर यांच्या कानी शिवरायांचे तेजस्वी कार्य व पराक्रमाच्या गाथा पडल्या आणि आणि ते शिवरायांच्या सैन्यात दाखल झाले.

कुडतोजी गुजर हे अत्यंत चतुर व बुद्धिमान होते. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांना शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यात नोकरी मिळाली. गुप्तहेराचे काम अत्यंत जोखमीचे व सावधगिरीचे असते. कुडतोजी गुजरांना ती कामगिरी अत्यंत चोखपणे, जबाबदारीने, विश्वासाने पार पाडून स्वराज्यात आपली पत वाढवली. कुडतोजी गुजर यांच्यात आणखी एक महत्वाचा गुण होता तो म्हणजे त्यांची शरीर संपदा व युद्धकौशल्य !


                     गुप्तहेर म्हणून काम करतांना केवळ खबरी देणे किंवा खबरी आणणे एवढेच काम न करता कुडतोजींनी मोगली सैन्यांना रसद पुरवणाऱ्या, त्यांच्या घोड्यांना दानापाणी पुरवणाऱ्या तुकड्यांचा माग काढून त्यांच्या परस्पर काटा काढण्याचा उद्देश इमानेइतबारे केला. सैन्य पोटावर चालते; यामुळे मोहिमेत, युद्धप्रसंगी मोगल स्वार व घोडी यांची उपासमार व्हायची. या सर्वांचा फायदा मराठा सैन्याला मिळायचा.


                    कुडतोजीच्या सर्व कामगिरीकडे शिवाजी महाराजांचे लक्ष होते. त्यामुळे सैन्यात कडतोजींना वारंवार बढत्या मिळत गेल्या. शिवरायांसोबत राहून प्रतापरावांनी कारतलबखानाची फजिती केली, संभाजी कोंढाळकर यांचा वध केला, मिर्झाराजेंच्या खुनाचा प्रयत्न केला. कांचनबारीच्या युद्धात पराक्रम केला, साल्हेरच्या युद्धात पराक्रम केला. उमराणीत बहलोलखानाचा पराभव केला परंतु शरण आलेल्या बहलोलखानास क्षमा करून जिवंत सोडले. शिवरायांना बहलोलखानास केलेली क्षमा शिवरायांना आवडले नाही. त्यांनी कुडतोजींना ” बहलोलखानास मारल्याविना आम्हांस तोंड दाखवू नका” असे बोल लावले. शिवाजी महाराजांचे शब्द वर्मी लागलेला प्रतापराव गुजर बहलोलखानाच्या सैन्यावर आपल्या सात साथीदारांसह नेसरी खंडित तुटून पडले आणि लढता-लढता धारातीर्थी पडले.


                    शिवराज्याभिषेकाच्या अनमोल सोहळ्यात हिरा गळून पडल्याची बातमी समजली. शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले. शिवाजी महाराजांच्या पत्नी काशीबाईसाहेब यांच्या मृत्यू १९ मार्च १६७४ रोजी झाला होता. मात्र रयतेच्या कल्याणासाठी स्वतःची सुखदुःख बाजूला ठेवून शिवाजी महाराज नेसरीला गेले. जेथे प्रतापरावांनी व त्याच्या सात वीर साथीदारांनी आपल्या रक्ताने मातृभूमीला अभिषेक घातला होता तेथे शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्मरणार्थ वीर स्मारक बांधले.


                मिर्झाराजे जयसिंग यांच्या छावणीत जाऊन मिर्झाराजेंचा खून करण्याचा अयशस्वी  पण असामान्य प्रताप केला होता म्हणून शिवरायांनी कुडतोजींना ” प्रतापराव ” ही पदवी दिली होती. तेव्हापासून कुडतोजी गुजर प्रतापराव गुजर झाले होते.


               शिवाजी महाराजांनी प्रतापरावांच्या दुःखी पत्नीचे सांत्वन करून मुलाबाळांना धीर दिला. पुढे प्रतापरावांची कन्या जानकीचे लग्न शिवाजी महाराजांनी आपले धाकटे पुत्र राजाराम यांच्याशी लावले. पुढे ह्याच जानकीने ताराराणी बनून स्वराज्याचा इतिहास घडवला. शिवाजी महाराजांनी अशा अनेक वीर मावळ्यांच्या कुटुंबांना त्यांच्या मृत्यूनंतर धीर दिला होता. नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, वीर बाजी पासलकर आदि शूरवीरांच्या कुटुंबांना शिवाजी महाराजांनी आधार दिला होता. कोणालाही वाऱ्यावर सोडले नव्हते.


                प्रतापरावांना खंडोजी व जगजीवन अशी त्यांची मुले होती. छत्रपती संभाजीराजांचे विश्वासू सहकारी म्हणून प्रतापरावांची दोन्ही मुले शौर्य गाजवत होते. शंभूराजांच्या बलीदानानंतर महाराणी येसूबाईचे पुत्र शाहू महाराज यांना औरंगजेबाने कैद केले. त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेले खंडोजी व जगजीवन गुजर यांनाही औरंगजेबाने कैदेत टाकले. औरंगजेबाने शाहूमहाराजांनी धर्मांतर करावे यासाठी डाव पसरला. स्वराज्याचा वारस छत्रपती शाहूमहाराजांनी धर्मांतर करू नये ; त्याबदल्यात खंडोजी व जगजीवन गुजर धर्मांतरास तयार झाले. छत्रपती शाहू महाराजांच्या धर्मरक्षणासाठी वडिलांप्रमाणे दोघा भावांनीही त्याग केला. दोघा भावांचे औरंगजेबाने जबरदस्तीने धर्मांतर केले. खंडोजींचे नाव अब्दुल रहीम व जगजीवनराम यांचे अब्दुल रहमान असे नाव ठेवण्यात आले.


                  शाहू महाराज व महाराणी येसूबाई यांची सुटका झाली. शाहू महाराजांनी प्रतापरावांच्या या दोघा मुलांना अपार स्वराज्यनिष्ठेबद्दल पारजवळील साडगाव बक्षीस दिले. प्रतापरावांनंतर त्यांच्या दोन्ही मुलांनी स्वराज्यासाठी जे योगदान दिले त्यामुळे स्वराज्याच्या सीमा हिंदुस्थानभर पसरण्यास मदत झाली.  प्रतापराव गुजर यांचे समाधीस्थळ कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज तालुक्यात नेसरी याठिकाणी आहे. प्रतापरावांसह सात वीरांची बुज राखत नेसरीकरांनी त्यांचे भव्य स्मारक नेसरी येथे उभे केले आहे.

                लेखन: चंदन पवार 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close