संस्कृती

🚩शिवचरित्र भाग : १२९🚩 ” प्रतिशिवाजी ” नेताजी पालकर

नेताजी पालकर उर्फ ” प्रतिशिवाजी” हे शिवाजी महाराजांचे मावळातील सवंगडी ! दीर्घकाळ शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सरनोबत होते. नेताजी पालकर स्वराज्यस्थापनेच्या सुरुवातीपासून शिवरायांसोबत होते. म्हणूनच त्यांना “प्रतिशिवाजी” म्हणजेच “दूसरा शिवाजी” असेही म्हटले जायचे.


                    नेताजी पालकर मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर गावाचे होते. इ. स. १६२० साली नेताजींचा जन्म रायगड जिल्ह्यातील खानापूर या गावी झाला होता. नेताजी पालकर यांची कारकीर्द बरीच मोठी राहिली आहे. नेताजींनी अफजलखानाची स्वारी, पन्हाळगडाचा वेढा, उंबरखिंडीत कारतलबखानाची फजिती, शाहिस्तेखानावरील छापा, सुरतेवरील पहिली स्वारी, पुरंदरचा तह अशी अनेक युद्धे गाजवून अद्वितीय कामगिरी केली.


                 उंबरखिंडीत फक्त दगडांचा वर्षाव करून कारतलबखानाला नेताजींनी शरण येण्यास भाग पाडले होते. अफजलखान वधावेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यासाठी नेताजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीच्या प्रत्येक संकटात नेताजी पालकर यांनी प्रचंड पराक्रम गाजवला. म्हणूनच शत्रूनेही त्यांना “प्रतिशिवाजी” अशी पदवी दिली होती.


                      शिवाजी महाराजांचा प्रत्येक मोहिमेत उत्तुंग यश मिळत असताना मिर्झाराजे जयसिंग यांनी मात्र पुरंदरच्या तहात शिवरायांना हार स्वीकारायला म्हणजेच दोन पावले मागे येण्यास भाग पाडले. पुरंदरच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या वादामुळे नेताजींना स्वराज्यापासून दूर जावे लागले. पुरंदर तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवराय, मिर्झाराजे, सरसेनापती नेताजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालुन गेले. परंतु तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान याच्यासमोर ते चौघेही अपयशी ठरत होते. या अपयशाचे खापर मात्र दिलेरखान शिवाजी महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी शिवाजी महाराज विजापुरहून परत आले.


                   शिवाजी महाराजांनी रात्रीच पन्हाळगडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी शिवाजी महाराजांची खात्री होती पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेताजी पालकर यांनी यायला उशीर केला. परिणामी वेळेवर कुमक न पोहोचल्यामुळे शिवाजी महाराजांना पन्हाळ्याच्या मोहिमेत माघार घ्यावी लागली. यामुळे सुमारे १००० माणसे मारली गेली. म्हणून शिवाजी महाराज नेताजींवर चिडले आणि त्यांना पत्राद्वारे ” समयास कैसा पाऊल उचलला नाहीस |” असे म्हणून बडतर्फ केले.


                   त्यानंतर नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. यावेळी विजापूरच्या आदिलशहाने त्यांना खमाम परगण्यातील जमकोरची जहागिरी बहाल केली. परंतु शिवाजी महाराज आग्र्याच्या भेटीस निघून आल्यावर मिर्झाराजांनी नेताजी पालकरांना विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले. परंतु मिर्झाराजांनी लगेचच त्यांना आपल्याकडे म्हणजे मोगलांकडे वळवून पाच हजाराची मनसब दिली. नेताजींना तामसा या परगण्यातील ५५ गावांची जहागिरी मोगलांकडून मिळवून दिली. तेव्हापासून नेताजी मोगलांचे चाकर झाले.


              आग्र्याच्या कैदेतून शिवाजी महाराज जेव्हा सुटण्यात यशस्वी झाले तेव्हा ” शिवाजी” सुटला आता “प्रतिशिवाजी ” सुटू नये या विचाराने औरंगजेबाने नेताजी पालकर यांच्या अटकेविषयीचे फर्मान दिनांक १९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी पालकर यावेळी मोगली छावणीत बीडनजीक धारूर येथे होते. दिनांक२४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झाराजे जयसिंग यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली.


                    चार दिवसांच्या अतोनात हाल यातनानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. दिनांक २७ मार्च १६६७ रोजी नेताजींनी धर्मांतर केले. ते मुस्लिम झाले. त्यांचे “मुहम्मद कुलीखान” असे नामकरण करण्यात आले. लागले. 
                    नेताजींना तीन बायका असून त्यातून एक महाराष्ट्रातच राहिली. तीच आपला धर्म अबाधित राखु शकली. जून १६६७ मध्ये औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहारच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा अपयशी प्रयत्न केला.


                       पुढे नऊ वर्ष नेताजी काबूल- कंदाहार येथे मोहिमेवर होते. शिवाजीमहाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते. त्यावेळी औरंगजेबाला प्रतिशिवाजी म्हणजे नेताजी पालकर यांची आठवण झाली. मग त्याने या मुहम्मद कुलीखानाला दिलेरखानास सोबत महाराष्ट्रात मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ मध्ये पश्चाताप झालेले नेताजी पालकर मोगली छावणीतून पळून राजधानी रायगडावर आले. १९ जून १६७६ रोजी शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर यांना विधिवत हिंदू धर्मात प्रवेश दिला.


                नेताजीला नरसोजी व करणसिंह अशी दोन मुले होती. शिवाजी महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले . इतिहासात नेताजींची फारशी माहिती उपलब्ध नाही. नेताजींच्या मृत्यू इ. स. १६८१ ला झाला. नेताजी पालकर यांची समाधी तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड येथे आहे. 

             लेखन: चंदन पवार 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close