संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग:१२५(अ)🚩 मर्दानी स्वराज्यसेवक जिवाजी महाले

प्रतापगडाच्या पायथ्याशी मु. पो. कोंडवली, ता. वाई, जिल्हा सातारा येथे साकपाळ कुटुंबात वीर जिवाजी यांचा जन्म ९ ऑक्टोबर १६६५ रोजी झाला. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर जिवाजी आणि त्यांच्या भावंडांचा सांभाळ देव महाला या आप्ताने केला. तेव्हापासून जिवाजींचे आडनाव ” महाले ” पडले.


                बालपणापासून त्याकाळी आलेल्या धकाधकीच्या संकटातून लढायांच्या काळात मुलांना लढाईचे प्रशिक्षण दिले जायचे. जिवाजी सुद्धा साताऱ्यातल्या तालमीतला ! त्याच मातीत मेहनत करणारा पठ्ठा ! जोर बैठका, तलवारबाजी, दांडपट्टा चालवणे यांचे शिक्षण त्याला मिळाले होते. मातीत कुस्त्या खेळणे प्रशिक्षणात तो चांगला पारंगत झाला.  तान्हाजीच्या उमरठ गावी भरलेल्या यात्रेत कुस्तीच्या स्पर्धेत शिवाजीराजे व जिवाजीची भेट झाली होती. त्यावेळी शिवरायांनी जीवजीला स्वराज्याच्या कार्यात सामील होण्याचे मत प्रकट केले होते. तेव्हापासून जिवाने स्वतःला स्वराज्यासाठी अर्पण करून घेतले होते.

जिवाजी दांडपट्टा तर असा फिरवायचा की पायाच्या टाचेखाली ठेवलेल्या लिंबाचे तो डोळ्याचे पाते लवते न लवते तोच दोन तुकडे करायचा. उंच उड्या मारण्यातही तो निष्णात होता. शिवाय त्याची नजरही तीक्ष्ण होती. वर उडी  मारल्यावर हवेतच शत्रूच्या शरीराचे तो दोन तुकडे करत असे.

https://youtu.be/5cXR7HbcF8U


                     जिवाजी महाले यांचे मुळगाव कोंडीवली बुद्रुक हे वाई तालुक्यात आहे. मात्र हे गाव गोम धरणामुळे स्थलांतरित झाले आहे. महाबळेश्वर, कोंडवली या गावी जिवजींचे वंशज राहताहेत. जिवा महालाचा मोठा भाऊ हा ताना महाले जीवा महालाचा मुलगा सिताराम; तर सितारामचा मुलगा सुभानजी ! सुभानजीचे पुत्र नवरोजी व काळोजी ! नवरोजीचा मुलगा हरी आणि काळोजीचा मुलगा सुभानी होय. हरी आणि सुभानी हे जिवा महालाचे खापर पणतू !


                    जीवा महालाने सय्यद बंडासोबत दोन हात करून शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. याप्रसंगी जिवा महालाचे वय २५ च्या जवळपास असावे असा कयास करण्यात येतो.. जिवा महाला यांच्या वडिलांनी जिवा महाला यांना पहिलवानीचे धडे दिले होते. दांडपट्टा चालवण्यात महाले समुदाय पटाईत होता.


             आजही महाले समुदायातील म्हातारे लोक दांडपट्टा चालवण्याचे कथन करतात. जिवा महाला सुद्धा दांडपट्टा चालवण्यात तरबेज होता म्हणूनच सय्यद बंडाने तलवार शिवाजी महाराजांवर उगारली तोच दांडपट्टा काढून जिवा महालाने त्याला पालथा पाडला. अशा या स्वामिनिष्ठ जिवाजी महाले यांची समाधी रोहिडा किल्ल्यावर बांधण्यात आली.


                 छत्रपती शाहूराजांनी १७०७ मध्ये जिवाच्या वंशजांना निगडे/साखरे ही गावे इनाम दिली. त्या इनामपत्रात जिवा महाला यांच्या मर्दानी, पुरातन व एकनिष्ठ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.                           

 स्वतःच्या जीवावर उदार होत ज्या जिवा महालाने शिवाजी महाराजांचा जीव वाचवला होता, ज्या जिवा महालाने शिवाजी महाराजांवर चाल करून गेलेल्या सय्यद बंडाला एका क्षणात यमसदनी पाठवला आणि इतिहासात ज्याचा पराक्रम ‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ या म्हणीने नोंदवला गेला त्या जीवा महालाची दखल भारतीय टपाल खात्याने घेतली असून ‘वीर जिवाजी महाला – शिवाजी महाराजांचे अंगरक्षक’ या नावाने पोस्टाचे विशेष पाकिट प्रकाशित केले आहे.


                      छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एका निष्ठावंत मावळ्याची दखल घेण्याची ही घटना पोस्टाच्या आणि देशाच्याही इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. यामुळे जिवा महालाच्या पराक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे.


               प्रतागपगडावर शिवाजी महाराजांनी गाजवलेला पराक्रम तर सर्वश्रुत आहेच पण, त्या पराक्रमाची गोष्ट ज्याच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही असा महाराजांचा अत्यंत विश्वासू , शूर अंगरक्षक म्हणजे जिवा महाला. पण तो इतिहासाच्या पुस्तकातच राहिला. आजही प्रतापगडावर कुठेही जिवा महालाच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारी शिळा नाही की स्मारक नाही.


               नाभिक समाजाने काही वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे जिवा महालाचे स्मारक प्रतापगडावर उभारावे अशी मागणी केल्याचेही समजते पण, राज्य सरकारने त्या मागणीची दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही. या पार्श्वभूमीवर टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलने काही प्रमाणात ही उणीव भरून काढली आहे.


                   ‘अखिल भारतीय जिवा सेना’ या संस्थेने याकामी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्याचे समजते. संस्थेने टपाल खात्याकडे जिवा महालाच्या नावाचे पोस्टाचे तिकीट काढावे असा प्रस्ताव दिला होता. यापेक्षा तिकिटाऐवजी विशेष पाकीट प्रकाशित करून शूर सरदाराची आठवण कायमस्वरूपी जतन करण्याचा निर्णय टपाल खात्याच्या वतीने घेण्यात आला. निर्णयाची अंमलबजावणी करत पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलने मंगळवारी या पाकिटाचे प्रकाशन मुंबई जिल्ह्याच्या पोस्टल सर्व्हिसेसचे संचालक प्रदीप कुमार यांच्या हस्ते नालासोपारा येथील टपाल कार्यालयात केले. या पाकिटावर जिवा महालाचे छायाचित्र आणि त्याखाली त्याचा कालावधी नोंदवला आहे. जिवा महालाने हातातील ज्या दांडपट्याने सय्यद बंडावर वार केला होता त्या दांडपट्टाचे रेखांकीत चित्रही पाकिटाच्या एका बाजूस काढण्यात आले असून ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ ही म्हण सुद्धा या पाकिटावर हिंदी आणि इंग्रजीत लिहिण्यात आली आहे. यामुळे शिवाजी महाराजांच्या एका शूर अंगरक्षकाची ओळख देशाला होईल असा विश्वास व्यक्त होतांना दिसतो.


                 मुंबईत अंधेरी (पूर्व) येथील ना.सी. फडके रस्ता आणि स्वामी रस्ता यांना जोडणाऱ्या एका छोट्या रस्त्याला जिवा महाले रोड म्हणतात
शिवप्रताप दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने जिवा महाले याच्या नावाने दरवर्षी एक पुरस्कार देण्यात येतो.

स्वराज्य न्यूज : मुख्य संपादक – श्री सागर ननावरे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close