आज जगभर महिला दिन साजरा केला जात आहे. एकेकाळी चूल आणि मुल मध्ये अडकलेल्या एकविसाव्या शतकातील स्त्रीने स्वत:ची शक्ती ओळखली आहे. काळ बदलला, आव्हानं बदलली. त्यामुळे तिची स्वत:ची, कुटुंबाची व समाजाची प्रगतीच झाली. एकूणच आर्थिक, राजकीय,सामाजिक, क्रीडा,मनोरंजन आणि इतर क्षेत्रांत सर्वांचे डोळे दिपून जावेत अशी अनोखी कामगिरी स्त्रीशक्तीने करून दाखविली.
हे सारं चित्र खूपच आल्हाददायक आणि स्त्री शक्तीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार असं आहे.
स्त्री आजच्या युगात ज्या गतीने आणि आत्मविश्वासाने ध्येयाची उंच उंच शिखरे सर करीत आहेत हे नक्कीच उल्लेखनीय आहे.
आज ८ मार्च ला ‘जागतिक महिला दिन’ महिलांच्या आर्थिक,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील योगदानाचे प्रतीक म्हणून जगभरात साजरा केला जात आहे. हा दिन सुरु करण्यामागचा उद्देश काहीही असला तरी यावर लिहायला घेतले कि अजूनही प्रतिकूल परिस्थिती पहिली कि एक विचार मनात जरुर येतो कि ,’पुरुषांच्या बरोबरीने आकाशाला गवसणी घालणारी स्त्री कि पुरुषी अहंभावापुढे अंधारात लोटलेली स्त्री’. कारण एकीकडे आपल्या तेजोमय वलयाने संपूर्ण जगाला प्रकाशमान करणारी स्त्री तर दुसरीकडे अज्ञान आणि प्रथांच्या अंधारात गर्भातच विश्वाचा निरोप घेणारी स्त्री असा विरोधाभास अद्यापही काही प्रमाणात का होईना अस्तित्वात आहे हि खंत आहे.
मुलगी जन्मा यावी शेजारच्या घरात
कुलदीपक मात्र हवा स्वतः च्याच दारात
कारण मुलीचा जन्म म्हणजे हुंड्याचा त्रास?
मुलीचा जन्म म्हणजे परक्या घराच्या सेवेसाठी आपला घास?आणि
मुलीचा जन्म म्हणजे पळून जाऊन लग्न केलं तर इज्जतीचा ह्रास !
काळ बदलतोय प्रगतीचे वारे अवकाशाच्या उंचीलाही ठेंगणे ठरवत चालले आहे आणि अशातही माणूस नावाच्या प्राण्याच्या विचाराची वाढ दिवसेंदिवस खुंटतच चाललीय. ईश्वराचीही स्त्री रूपात पूजा करणाऱ्या संस्कृतीचे वारस म्हणवणारे स्वतःच्या मुलीत ईश्वर का शोधत नाहीत?
“यत्र नार्यस्तु पुज्यन्ते, रमन्ते तत्र देवता !!”
या संस्कृतातील वचनाचा अर्थ असा आहे कि, जिथे स्त्रियांना पूजले जाते त्यांचा आदर केला जातो तेथे देवाचा निवास असतो. आपल्या संस्कृतीत प्रत्येक स्त्री वा परस्त्री माते समान मानून तिला वंदिले पुजिले जाते. तर दुसरीकडे एका स्त्रीच्याच पोटी जन्म घेतलेले काही नराधम जे पुरुष प्रधान समाजाचा झेंडा मिरवतात आणि बलात्कार,हुंडा आणि अपमानास्पद वागणुकीने जिच्यामुळे या जगात आलेत तिलाच कलंकित करतात. आजची स्त्री कितीही शिक्षित असली, स्वताच्या पायावर उभी असली तरीही ति सुरक्षित नाही हे खरच आपल दुदैव आहे. परंतु असे असतानाही निर्भीडपणे संकटांशी दोन हात करून आपल्या हक्कांसाठी लढणारी ही रणरागिणी आजही सक्षम आणि लढाऊ आहे ही अभिमानाची बाब आहे.
आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने यशाचे झेंडे रोवणाऱ्या त्या स्त्री शक्तीला गेल्या शतकभरात पुरुषांबरोबर कुठेही न्यायस्थान मिळाले नाही हे वास्तव नाकारता येणार नाही!
पूर्वी चित्रपटांत अबलेची भूमिका साकारणारी स्त्री आज स्त्रीपटांत , गुडांना लोळवत या काळात रूपेरी पडदा गाजवत आहे. पूर्वी नवऱ्याला उदंड आयुष्य लाभावं म्हणून उपवास करणाऱ्या स्त्रिया आज नवर्याच्या बरोबरीने नोकरी व्यायसाय करून संसाराचा गाडा अभिमानाने चालवत आहे. चार भिंतीत झिम्मा खेळणारी स्त्री आज उंबरठा ओलांडून राष्ट्रकूल स्पर्धा, ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांत देशविदेशात देशाभिमान जागा करीत आहेत. पूर्वी डोक्यावरचा पदर सावरत आकाशाकडे पाहणारी स्त्री आज महिला वैमानिक होऊन संपूर्ण जगाला अवकाशातून स्वाभिमानाने न्याहाळत आहे.आणि तरीही आम्ही पुरुषप्रधान नावाची आंधळी आणि बिनकामाची बिरुदावली मिरवतोय हि लज्जास्पद गोष्ट आहे.
स्त्री कधीच अबला नव्हती याला इतिहास साक्षी आहे राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले,मदर तेरेसा यांच्यापासून ते कविता राऊत, स्व. कल्पना चावला, स्व.नीरजा,डॉ किरण बेदी, डॉ मंदा आमटे, मा.राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील प्रत्येकीने एक नवी क्रांती घडवली आहे. ही स्त्री अमाप धैर्य बाळगणारी, लढाऊ वृत्ति अंगी असलेली, तरीही नम्र,सोज्वळ, सहनशील, शालीन, आणि प्रेमळ आहे. बांगड्यांचे वजन पेलणार्या नाजूक हातांनी वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन इतिहासालाही आपली दखल घ्यायला लावली हिच ती खरी स्त्री शक्ती.
स्त्रीची प्रतिष्ठा फक्त पतिव्रता जपणारी पत्नी अथवा जबाबदार माता होण्यातच नाही, तर ,कणखर वीर स्त्री होण्यात आहे. आज जगातील असंख्य हिरकणींनी आयुष्याचा शिखराला जिद्द आणि संघर्षाने केव्हाच सर केले आहे. त्यांच्या या जिद्दीनेच कित्येक आयुष्य उभारली आहेत. त्यांच्या या दुर्दम्य अशावादातूनच उदयाच्या आयुष्याची पहाट उगवणार आहे.
आज आई,बहिण,पत्नी अशा एक न अनेक भूमिकांतून आपल्याला सावरणारी, आधार देणारी स्त्री हा समाजाचा कणा असून त्यावरच समाजाचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे केवळ महिलादिनाला तिचे महत्व जोपासण्यापेक्षा प्रत्येक दिवसाला तिच्यातील शक्तीचा आणि तिच्या कर्तुत्वाचा आदर आदर केल्याने नक्कीच समाज सशक्त होईल.
आज महिला दिनाच्या निमित्ताने तमाम महिलाशक्तीला मानाचा मुजरा…!
लेखक : सागर ननावरे