ताज्या घडामोडी

🚩शिवछत्रपती भाग:१०६🚩 ” वेडात मराठे वीर दौडले सात ….!! “

शिवाजी महाराजांना माहीत होते की बहलोल नावाचा जहरी साप एक दिवशी स्वराज्यावर उलटेल आणि दौलतीची खराबी करेलच ….! आणि झालेही तसेच बहलोल खान कोल्हापूर प्रांतात फिरत होता. सैन्य गोळा करुन योग्य संधीची वाट बघत होता. प्रतापरावांच्या मनात स्वतःच्या चुकीबद्दल विलक्षण पश्चाताप होता. शिवाजी महाराज आपल्यावर रागावले , माझ्या कृतीमुळे नाराज झाले ही गोष्ट त्यांना डिवचत होती.


                       प्रतापराव त्याच उद्विग्न अवस्थेत दख्खन भागात स्वाऱ्या करत होता. विजापूरकरांची हमरीची पेठ त्याने लुटून साफ केली. इंग्रजांची वखार प्रतापरावांनी पुरुषभर खणून लुटली. या इंग्रजांच्या वखारीत त्यांना ३०००० ची दौलत मिळाली. प्रतापराव लढत होता , शाही मुलुखावर छापा घालत होता. पण एवढ्या धावपळीतही त्यांना शिवाजी महाराजांची रागावलेली ,निराश मुद्रा सतत डोळ्यासमोर दिसत हाती .


                    एक दिवशी बहलोल खान नावाचा जहरी साप स्वराज्यावर उलटला. तो पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी निघाला होता. शिवाजी महाराजांना ही बातमी समजली. राज्याभिषेक प्रसंगी शत्रूने उचल खाल्लेली महाराजांना सोसणारे नव्हते. प्रतापरावांनी बहलोल खानाचा खात्मा करावी  व झालेल्या चुकीची भरपाई करावी ह्या हेतूने त्यांनी सरनोबत प्रतापराव गुर्जरांना कडकडीत पत्र लिहले ,” हा बहलोल घडोघडी येतो ! तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बहलोल याची गाठ घालून  , त्यास मारून फत्ते करणे  ! नाहीतर तोंड न दाखवणे ..!! “

जाहिरात

शिवरायांचे पत्र आले तेव्हा प्रतापराव गडहिंग्लज परिसरात होते. शिवाजी महाराजांचे पत्र वाचल्यावर ” आम्हांस तोंड न दाखवणे…!!” हे शब्द प्रतापरावांच्या खूप जिव्हारी लागले. शिवाजी महाराजांच्या पत्रातील जळजळीत शब्दांनी प्रतापरावांच्या कानात जणू उकळलेले तेल ओतले गेल्याचा भास झाला. पत्रातील महाराजांचे शब्द त्यांचा राग ताजा असल्याची साक्ष देत होते. प्रतापरावांचे सुख जणू त्यांच्यावर रागावले होते. रणांगणावर शत्रूच्या गर्दीत बेधडकपणे घुसून तलवारीचे घाव छाताडावर झेलणारा मराठ्यांचा रणमर्द सरसेनापती शिवाजी महाराजांच्या शब्दांनी घायाळ झाला होता. प्रतापराव कडकडीत निष्ठेचा शिलेदार होता. बहलोल खानाचा खात्मा केल्याशिवाय त्याला शिवाजी महाराजांचे प्रसन्न दर्शन होणार नव्हते.


                       तिकडे रायगडावर     शिवराज्याभिषेकाची तयारी जोरात चालू होती. काशीचे प्रसिध्द नामवंत ब्राम्हण पंडित गागाभट्ट यांच्या हातून वैदिक पध्दतीने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. रायगडावर पंत पेशवे होते , पंत डबीर होते , वाकनिस होते, पंडितराव होते, न्यायाधीश होते, मुजुमदार होते पण सरनोबत मात्र नव्हते. शिवराज्याभिषेकापूर्वी जर बहलोल खानाचा फडशा पाडला नाही तर शिवराज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराजांना माझा पहिला मुजरा होऊ शकत नाही म्हणून प्रतापराव बहलोलच्या मागावर होते.


                       अखेर तो दिवस उजाडला, २४  फेब्रुवारी १६७४ . आपल्या अवघ्या सहा मराठी शिलेदारांसह प्रतापराव आपल्या छावणीपासून काही अंतरावर होते. तेव्हा त्यांना खबर आली “बहलोल खान मोठी फौज घेऊन नेसरीच्या खिंडीच्या दिशेने येत आहे. ” बहलोल खानाचे नाव ऐकताच प्रतापरावांची तळपायाची आग मस्तकाला भिडली. हाच तो बहलोल ज्याचा खात्मा केल्याशिवाय मी शिवाजी महाराजांना मुजरा करणार नाही.

म्हणून प्रतापरावांनी आपल्या सहा शिलेदारांसह जमिनीवरची धूळ उडवीत बेभान, बेफाम होऊन नेसरीच्या खिंडीच्या दिशेने निघाले. बहलोल खानाचा खात्मा करण्यासाठी विसाजी पिल्लाळ, विठोजी शिंदे , विठ्ठल पिळदेव, दीपाजी राऊतराव , सिद्दी हिलाल,कृष्णाजी भास्कर व प्रतापराव गुर्जर तया सातही मराठी शिलेदारांची हातातील शस्त्रे जणू अधीर झाली होती.महासागरातील जणू सात लाटा पृथ्वीला गिळंकृत करण्यासाठी किनाऱ्याच्या दिशेने निघाल्या होत्या. एवढ्या मोठ्या पठाणी फौजेसमोर आपला सात जणांचा टिकाव लागेल की नाही याचा त्यांनी यत्किंचितही विचार केला नाही. प्रतापरावांच्या डोक्यात, मनात जी राग, संताप व सुडाची चूल धगधगत होती तिला कोणीही विझवू शकत नव्हते.


                        बहलोल खान आपल्या अफाट फौजेनिशी नेसरीच्या डोंगरातील खिंडीत पोहचला. तेवढ्यात धुळीचा पिसारा पसरीत पसरीत हे सातही जण बहलोल खानाच्या फौजेवर तुटून पडले. त्या सातही मराठी वीरांचा आवेश पाहून बहलोल खान चकित झाला. अवघ्या सहा मराठ्यांना घेऊन आपल्यावर चालून आलेल्या प्रतापरावांना पाहून बहलोलला वाटले की जणू दिव्यावर झडप घालायला पतंगच आले आहे. विजेसारखी तलवार चालवीत ते सातही जण बहलोलच्या पठाणी फौजेत धुमाकूळ घालत होते. पठाण मरत होते तर पठाणांच्या तलवारीच्या वारांनी हे सातही मराठी वीर ठिकठिकाणी जखमा होऊन रक्तबंबाळ झाले होते. नेसरीची खिंड रक्ताने न्हाऊन गेली होती. त्या सातही जणांना आता बहलोलच्या पठाणांनी सर्व बाजूनी घेरले. तरीही यांनी पराक्रमाची शर्थ केली. पण एवढ्या मोठ्या फौजेसमोर ते सात मराठी वीर किती वेळ टिकणार ? एक एक इरेचा मोहरा धरतीवर कोसळू लागला. शर्थीची समशेर करून अखेर प्रतापरावही पडला. दख्खनच्या दौलतीतले हे सातही तारे तुटले. महाराष्ट्रातील आणखी एक खिंड या सातही मराठी वीरांच्या रक्ताने पावन झाली.


                 शिवराज्याभिषेकाच्या शुभ प्रसंगी प्रतापराव खर्ची पडल्याची बातमी रायगडावर आली. शिवाजी महाराजांना हे कळताच त्यांच्या वर्मी मोठा घाव बसला. आपल्या पत्रातील शब्दांनी घायाळ होऊन प्रतापरावांनी हे अग्निदिव्य केले व मृत्यूला कवटाळले हे समजताच शिवाजी महाराज आणखीनच कष्टी झाले. “आम्हांस तोंड दाखवू नका ” असे शिवाजी महाराजांनी पत्रातून प्रतापरावांना म्हटले होते. प्रतापराव आता खरोखर शिवाजी महाराजांना तोंड दाखविण्यासाठी येणार नव्हता. हा विचार येताच शिवरायांचे डोळे पाणावले. शिवराज्याभिषेकाचा सुवर्णकलश हाती धरून शिवाजी महाराजांच्या मस्तकावर दुग्धधारा धरण्यास आता प्रतापराव येणार नव्हता. निष्ठा , निस्वार्थ प्रेम यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे सात मराठी वीर होत. त्यांचा अतुल पराक्रम शिवइतिहासात ” वेडात मराठे वीर दौडले सात …” अशा सुवर्णाक्षरांनी लिहला गेलाय.


                स्वराज्याचा सरसेनापती प्रतापराव गुजर यांना यमसदनी पाठवणारा बहलोलखान स्वैरपणे वावरत होता. शिवरायांना हे रुचत नसल्याने स्वतः बहलोलखानावर चालून जाण्याचा मनोदय केला. पण राज्यभिषेक तोंडावर आलेला असतांना शिवरायांनी मोहिमेवर जाणे योग्य नव्हते म्हणून आनंदराव व हंबीरराव बहलोलखानावर चालून गेले. पुढचे संकट ओळखून बहलोलखानाने दिलेरखानाशी हातमिळवणी केली. मोगल व बहलोलखान एक झाल्याने त्यांची फौज वाढली. एवढ्या मोठ्या फौजेशी सामना करणे कठीण असल्याने आनंदरावांनी आपल्या फौजा सरळ शत्रुसैन्याला चुकवून कानडी मुलखात घुसवल्या. बहलोलखानाची जहागीर, संपगावचा बाजार आणि आदिलशाही मुलूखाची होळी करत बैलांवर लूट लादत त्या मुलुखातून आनंदराव माघारी वळले.


                 आनंदरावांनी आपल्या मुलूखाची धूळधाण केली हे कळताच रागावलेल्या बहलोलखानाने आनंदरावांना बंकांपुरापाशी गाठले. प्रतापरावांच्या सुडानं पेटलेली मराठी फौज त्वेषाने बहलोलखानास भिडली. या झालेल्या घनघोर लढाईत मराठे उजवे ठरू लागले हे पाहून बहलोलखानाचे सैन्य पळू लागले. बहलोलखानाचा भाऊ या लढाईत मारला जाऊन बहलोलखानाचा पराभव झाला. जिंकलेली घोडी व संपत्ती घेऊन आनंदराव रायगडावर परतले. शिवरायांनी स्वतः आनंदरावांच्या पगडीवर शिरपेच चढवला.


                  सरनोबत प्रतापराव गुर्जरांच्या बलिदानाने व्यथित झालेल्या शिवाजी महाराजांनी त्यांची बुज राखली. शिवरायांनी आपले धाकटे पुत्र युवराज राजारामांचा विवाह प्रतापरावांची कन्या जानकीबाईशी करण्याचे वचन प्रतापरावांच्या कुटुंबियांना दिले. पराक्रमी पित्याची कन्या पुढे पराक्रमी घराची सून झाली.हीच जानकीबाई पुढे ” ताराबाई ” झाली. जिने पुढे स्वराज्याची सेवा करतांना मोगलांना नामोहरण केले.

               लेखन: चंदन पवार 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close