मावळ मतदारसंघातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांवर ‘मोदी की नजर’

पिंपरी, 30 एप्रिल – ‘अब की बार, चार सौ पार’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक -एक जागा महत्त्वाची असल्याने सहा जणांचे खास पथक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले आहे. महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते विजयासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत बारकाईने माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या गोपनीय अहवालाच्या आधारे पुढील संधी मिळणार असल्याने महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मताधिक्य मिळवून देण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र दिसत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून विजयी होण्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. विक्रमी मताधिक्य मिळावे यासाठी दिल्लीहून आलेले हे पथक विशेष प्रयत्न करणार आहे.

चार श्रेण्यांमध्ये मूल्यांकन

बारणे यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे व जीव तोडून काम करीत असलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामांची नोंद या पथकामार्फत घेतली जाणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कामगिरीची चार श्रेणीमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. सर्वोत्कृष्ट श्रेणीमध्ये आपले नाव राहावे यासाठी स्पर्धा लागल्याचे दिसून येत आहे.

ब्लॅक लिस्ट : धोक्याची घंटा

महायुतीच्या घटकांमध्ये काही कार्यकर्ते वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षांपोटी प्रचारापासून अलिप्त राहत आहेत किंवा विरोधात काम करत असल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष माहिती घेऊन अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नावे चौथ्या श्रेणीत अर्थात ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये असणार आहेत.

त्या संदर्भातील अहवाल संबंधित घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात येणार आहे. महायुतीच्या वतीने यापुढे ब्लॅक लिस्ट मधील कोणत्याही व्यक्तीला संधी देण्यात येणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!