लोकसभा निवडणुका उंबरठ्यावर आलेल्या आहेत. नेत्यांच्या गाठीभेटी आणि दौऱ्यांनी चांगलाच वेग पकडला आहे. कमीत कमी वेळेत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय नेते अक्षरशः रात्रीचा दिवस करत आहेत. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू होईल या धास्तीने गेल्या महिनाभरापासूनच राजकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. अधिकृत प्रचार अद्याप सुरु झाला नसला तरी उमेदवाराची प्रतिमा जनमानसात आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. या सर्व प्रक्रियेत स्थानिक मीडिया, बॅनर्स यासोबतच डिजिटल यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु झाला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. आणि हाच पैलू पकडत सोशल मीडियाने नागरिकांना हा अधिकार बजावण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या.

               सोशल मीडियापुर्वी जगभरात इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मोजक्याच साधनांनी जम बसवला होता. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा राजकारणात केलेला वापर बराच काळ प्रभावी ठरला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रैंकलिन डी. रूजवेल्ट १९३३ पासून रेडिओच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधत असत. तर यानंतर एक पाऊल पुढे टाकत आणि अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी १९६१ ते १९६३ दरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी दूरचित्रवाणीचा प्रभावी वापर केला. या दोघांनी हे तंत्रज्ञान स्वीकारत मतदार आणि राजकारणी यांच्यातील संवादाची दरी कमी केली. पुढे जगभर या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. परंतु त्यानंतर चार दशकानंतर सोशल मीडियाचा उगम झाला आणि त्याने क्रांती घडवून आणली. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला सोशल मीडियाचा वापर काही प्रमाणात सुरु झाला. परंतु राजकीय क्षेत्रात २००८ साली बराक ओबामा यांनी बहुसंख्य मतदारांना एकत्रित करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. २००८ ची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रचारात सोशल मीडियाचा वापर केला. एका रिसर्च रिपोर्ट नुसार या निवडणुकीत अमेरिकेतील सुमारे ७४% इंटरनेट वापरकर्त्यांनी निवडणुकीच्या बातम्या ऑनलाइन शोधल्या होत्या. याचा परिणाम म्हणजेच बाराक ओबामा यांचा झालेला विजय.

                     २०१४ साली देशाच्या राजकारणात प्रदीर्घ काळानंतर सत्तापालट झाला. आणि यात डिजिटल प्रचारयंत्रणेचा खऱ्या अर्थाने बोलबाला झाला. भारतात हा ट्रेंड अमेरिकेतून आला. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून सुरू झालेला हा ट्रेंड २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतात वापरला गेला. भारतीय जनता पक्षाने या नव्या तंत्रज्ञानाची ताकद लक्षात घेत आधुनिक प्रचारयंत्रणा राबविली. आणि विशेष म्हणजे यातून भारतीय मतदाराची मानसिकता बदलण्यात यश मिळवले. या डिजिटल प्रचार यंत्रणेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची सेवा देखील घेण्यात आल्याचे सांगितले जाते. पुढे ही गोष्ट विरोधी पक्षांच्या देखील लक्षात आली परंतु तोपर्यंत ‘पक्ष्याने शेत खाऊन टाकले’ अशी त्यांची अवस्था झाली होती.

                     तसे पाहता सोशल मीडियाचा प्रभाव राजकीय क्षेत्रात जरी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसला असला तरी देशाला हे नवीन नव्हते. कारण त्यापूर्वी २०११ साली याच सोशल मीडियाने आण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनाला चांगलीच धार मिळवून दिली होती. सोशल मीडियामुळे जणू एका नव्या क्रांतीची झलक त्याकाळात पाहायला मिळाली होती. हे आंदोलन देशभरात वेगाने पसरले होते. याच सोशल मीडियाचा वापर लोकसभा निवडणुकीत उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे करण्यात आला. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यूट्यूब असे अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने लोकमनाचा ताबा घेतला. राजकीय पक्षांनी तर निवडणुकीसाठी निर्भयपणे त्याचा वापर केला आणि प्रभाव पडला .

निवडणुकीत सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावते. निवडणूक प्रचाराचे जे काम पूर्वी हजारो कामगार करत असत, ते आता फक्त काही लोक आयटी सेलच्या माध्यमातून करतात. २०१३-२०१४ नंतर आयटी क्षेत्रात मोठे बदल झाले. पूर्वी लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी राजकीय पक्ष बॅनर आणि पोस्टर्स छापत असत. आता ती माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवली जात आहे. राजकीय पक्ष प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. २०१४ पूर्वी कोणत्याही राजकीय पक्षात आयटी सेल नव्हता, परंतु आज प्रत्येक राजकीय पक्षाचा आयटी सेल कार्यरत आहे. पक्ष प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा सर्रास वापर केला जात आहे.

          भारतात राजकीय क्षेत्रातील सोशल मीडियाला एव्हाना दशकपूर्ती झाली आहे. या दशकभरात अनेक नवनवीन डिजिटल साधने उदयास आली आहेत. कालानुरूप त्यांची परिणामकारकता बदलताना दिसत आहे. अशात लोकांचा मूड समजून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ सोशल मीडियाचा वापर पुरेसा नाही हे राजकीय पक्षांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उपलब्ध साधनांपैकी कोणत्या साधनाला कोण कशा पद्धतीने वापरात आणतो यावर बरीच गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर कुठे ? कसा ? आणि किती प्रमाणात करायचा याचा उलघडा जिथे होईल तीच रणनिती प्रभावी ठरणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!