ऐतिहासिक निवडणुकीच्या उंबरठ्यावर … 

२०२४ ची लोकसभा निवडणुक देशाच्या राजकीय पटलावरील एक महत्वपूर्ण निवडणूक ठरणार आहे. कारण नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारने विजयाची हॅट्ट्रिक केली तर ही ऐतिहासिक घटना ठरेल. सलग तीन वेळा पंतप्रधानपदावर निवडून येणारे नरेंद्र मोदी हे पहिले बिगर काँग्रेस नेते असतील. तर दुसरीकडे निकाल भाजपच्या विरोधात गेला तरी इतिहासच घडणार आहे.  २०२४ ची लढत नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधक अशीच असणार आहे. राजकीय दृष्टिकोनातून याला एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असे नाव देण्यात आले आहे.

        लोकसभा निवडणुकीत भाजपला ३७० जागा आणि एनडीएच्या गोटात ४०० हून अधिक जागा मिळतील असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.  तर दुसरीकडे काँग्रेस, टीएमसी, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना, द्रमुक, सीपीआय यासह अनेक पक्षांनी एनडीए विरुद्ध  लढण्यासाठी एकजूट केली आहे. तर भाजपचा विचार केल्यास  बिहारमध्ये जेडीयू, लोक जनशक्ती पक्ष आणि एचएएम एनडीएसोबत आहेत, तर यूपीमध्ये भाजपने सुभाषप, आरएलडी आणि अपना दल (सोनेलाल) यांच्यासोबत युती केली आहे. यंदाच्या निवडणुकीत दिल्ली, हरियाणा, छत्तीसगड आणि झारखंड या हिंदी पट्ट्यातील चार मोठ्या राज्यांवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. त्यामुळे  या राज्यांतील निवडणुका चुरशीच्या होणार यात शंका नाही.

२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि एनडीएने 95 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या होत्या. याशिवाय गुजरात आणि महाराष्ट्रातही भाजपला मोठा फायदा झाला. आणि म्हणूनच २०२४च्या निवडणुका काँग्रेस पक्षासाठी अस्तित्वाची लढाई  आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यात सर्व विरोधी पक्षांची एकजूट बांधून ठेवण्यात इंडिया आघाडीला अद्याप पूर्णपणे यश मिळालेले नाही.

तृणमूल काँग्रेसने बंगालमधील सर्व ४२ लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तर महाराष्ट्रात अद्याप जागावाटप झालेले नाही. त्यातही राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितने अद्याप महाविकास आघाडीत येण्याबाबत दुजोरा दिलेला नाही. शिवाय महाराष्ट्रात एनडीए विरोधक आपापसातच सतत एकमेकांविरोधात बोलताना दिसतात. त्यामुळे अंतिम जागावाटप कसे होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

केरळमध्ये काँग्रेस आणि डावे पक्षच एकमेकांचे मुख्य  प्रतिस्पर्धी असल्याने तिथेही आघाडीत संघर्ष आहे. सीपीआय (एम) पॉलिटब्युरोचे सदस्य आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी काँग्रेसवर वेळोवेळी टीकाच केली आहे. येथे डाव्यांनी अनेकदा राहुल गांधींना वायनाड मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याची विनंती केली आहे. या जागेवरून सीपीआयने ॲनी राजा या तगड्या उमेदवाराला उभे देखील केले आहे. त्यामुळे एकूणच प्रादेशिक स्तरावर इंडिया आघाडी अद्याप म्हणावी तितकी मजबूत नाही. याउलट भाजप आणि मित्रपक्षांच्या एनडीएने मात्र जागावाटपाची सलग दुसरी लिस्ट जाहीर करून निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. आणि विशेष म्हणजे नाराज उमेदवारांना आणि फुटलेल्या पक्षांना शांत करण्याचे आव्हानदेखील त्यांनी लीलया पेलले आहे.

आत्तापर्यंत, पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि पंजाबमध्ये आम आदमी पार्टी हे दोन प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उदयास आले आहेत जे आपापल्या राज्यात भाजपला कडवी टक्कर देत आहेत. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विरोधकांची स्थिती ककमकुवत झाली आहे. जागा वाटप आणि उमेदवारांचा विचार करता सध्या भाजप मजबूत स्थितीत दिसत आहे. परंतु राजकारणात मतदारांचा कौल हा अंतिम निकाल लावत असल्याने आताच अंदाज वर्तविण्यात काहीही अर्थ नाही. १३ मे पर्यंत देशात कोणाची सत्ता येणार हे स्पष्ट होईलच. तसेच पंतप्रधान मोदी राहतील की नाही याचादेखील निर्णय होईल. परंतु दरम्यान  राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे  या नेत्यांचे भवितव्य या निकालाने ठरवले जाणार हे मात्र नक्की.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!