वन्यजीव सप्ताहानिमित्त वृक्षारोपण अभियान

बायोस्फिअर्स; म्युनिशंस इंडिया लिमिटेड ऑर्डनन्स फॅक्टरी – देहुरोड; द सत्संग फाउंडेशन – पुणे, एकोस्फिअर या संस्थांच्या माध्यमातून आयोजित एका अनोख्या वृक्षारोपण अभियानाची सुरुवात नुकतीच झाली. वन्यजीव सप्ताहानिमित्त या अभियानात ३१३२ देशी वृक्षांच्या रोपांचे रोपण केले जात आहे. हे अभियान केंद्रीय विद्यालय क्र.२ शेजारील ऑर्डनन्स फॅक्टरी देहुरोड टेकडी क्षेत्रात वन्यजीव सप्ताहानिमित्त चालू आहे. सदर वृक्षारोपणाची सुरुवात त्रिवेणी वृक्ष श्री. एन. पी. नाईक, अतिरिक्त जनरल मॅनेजर, ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड यांच्या शुभहस्ते लावून झाली. या प्रसंगी ऑर्डनन्स फॅक्टरी देहुरोडचे कार्य व्यवस्थापक आणि अभियंता श्री. नितीन जैन, बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन अनिल पुणेकर; देहू कँटोन्मेंट बोर्ड चे उपाध्यक्ष ॲड. कैलास पानसरे, द सत्संग फाउंडेशन – पुणे चे श्री. आनंद मुळे, देहुरोड डॉक्टर्स असोशिएशनचे डॉ. रमेश बन्सल, ऑर्डनन्स फॅक्टरी – देहुरोडचे अधिकारी – कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संखेत उपस्थित होते.

त्रिवेणी वृक्षारोपण म्हणजे वड, पिंपळ आणि कडुलिंब यांचे एकत्रित रोपण. वड, पिंपळ आणि कडुलिंब या तिन्हींच्या समान गुणांमुळे त्यांना त्रिवेणी म्हणतात. त्रिवेणी वृक्षारोपणाला पर्यावरणाबरोबर अध्यात्मातही खूप महत्त्व आहे. वटवृक्ष हे महात्मा बुद्धांचे निवासस्थान होते. म्हणून त्याला बोधीवृक्ष असेही म्हणतात. हे अनेक आजारांवर फायदेशीर आहे. पिंपळाचे झाड हे झाडांमध्ये श्रेष्ठ असल्याने त्याला झाडांचा राजा आणि धर्माचे झाड म्हटले जाते. अनेक रोगांवरही याचा उपयोग होतो आणि यामुळे आपल्याला भरपूर, सातत्याने प्राणवायू मिळतो. कडुलिंब हे निसर्गाचे अनोखे वरदान आणि ईश्वराची अनोखी देणगी आहे. कडुलिंब हा आरोग्याचा खजिना असून अनेक आजारांवर फायदेशीर आहे.

 

पर्यावरणीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या या अभियानात वड, पिंपळ, औदुंबर, कडुलिंब, जांभूळ, आवळा, चिंच व इतर देशी प्रजातींचे रोपण करण्यात आले. जनमानसात वृक्षांबाबत काही अंशी जाण व आत्मीयता वाढावी, वृक्षांचे संवर्धन व्हावे व शहराचे हरित क्षेत्र वाढावे या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. दत्तात्रय गायकवाड यांनी केले तर प्रस्तावना डॉ. सचिन पुणेकर यांनी केली. सदर अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी श्री. विजय जोशुवा, श्री. अशोक थोरात, श्री. वसीम मुलाणी, श्री. शैलेंद्र पटेल व श्री. गिरीश गोखले तसेच देहुरोड डॉक्टर्स असोशिएशन- देहुरोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ- निगडी व ऑर्डनन्स फॅक्टरी देहुरोड- सर्व कामगार संघटना व असोशिएशन यांचे मौलिक सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!