तृतीयपंथीयांच्या सन्मानार्थ रक्षाबंधन, आयुक्त शेखरसिंह यांची उपस्थिती

पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी : भारतीय परंपरेत संस्कार आणि संस्कृती संवर्धनासाठी विविध सण साजरे केले जातात. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होऊनही लिंगभेद कायम आहे. समाजातील दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, स्वाभिमान, सन्मान आणि स्वतंत्रता या तिन्ही गोष्टी या समाजात आपण निर्माण करणे अपेक्षित आहे. हा दृष्टिकोन समोर ठेवून जनजागृतीच्या उद्देशाने “नारी द वूमन” संस्थेच्या वतीने एक आगळावेगळा रक्षाबंधन सोहळा साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे हा सोहळा पिंपरी चिंचवड आयुक्त कार्यालयात आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

तृतीयपंथी हा घटक मानवी समाजातील वंचित असा एक घटक आहे. त्यांना घर, कुटुंब, भाऊ असे कोणतेही नाते नसते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी बोलताना आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले की, मी भावासारखा आपल्या पाठीशी सदैव उभा राहील. तसेच त्यांच्यासाठी विविध सोयीसुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासनही दिले. त्याचबरोबर शहरात तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह व संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण हॉस्पिटल मध्ये तृतीय पंथीय रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था सुरू केली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी नारी द वुमन संस्था अध्यक्षा अर्चना मेंगडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त रविकिरण घोडके, श्री पुरंदरे, गोविंद वाकडे, अशोक कोकणे आदि उपस्थित होते.

या उपक्रमात तृतीय पंथीयांना सहभागी करून दिलेल्या सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!