कलंकित राजकारणाचा वलयांकित प्रश्न

काही दिवसांपूर्वी कलंक’ या शब्दावरून सध्या महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं होतं . शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच नाशिक दौरा केला. तिथे त्यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांवर निशाणा साधला. फडणवीस यांचा थेट ‘कलंक’ असा उल्लेख ठाकरे यांनी केला. आणि या वक्तव्याचे पडसाद राज्यभर दिसून आले. नेते मंडळींनी ‘कलंक’ ला केंद्रस्थानी ठेवत टीकेचे बाण एकमेकांवर सोडले. ठाकरेंच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ‘कलंकीचा काविळ’ म्हणत ठाकरेंना प्रत्त्युतर दिले. आणि ऐन पावसाळ्यात शाब्दिक चिखलफेकीचा कार्यक्रम चांगलाच रंगला.

                    सध्याच्या राजकारणात अशी वक्तव्ये काही नवीन नाहीत. मात्र पूर्वी सुसंस्कृत राजकारणाचे दाखले देत अशी वक्तव्ये क्वचितच ऐकिवात येत असत. परंतु हल्ली मात्र दिवसाची सुरुवात आणि शेवटही अशीच वक्तव्ये ऐकून होतो ही मोठी शोकांतिका आहे. राजकारणात अशी अनेक बेताल वक्तव्ये प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी, मूळ विषय भरकटवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना उत्तेजित करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जातात. अनेक बिनबुडाचे आरोप- प्रत्यारोप करून मतदारांसमोर कार्यकुशल प्रतिमा दाखविण्याचा प्रयत्नही केला जातो. आणि विशेष म्हणजे गुडघ्याला बाशिंग आणि बुद्धी बांधलेले कार्यकर्ते याला बळी पडून द्वेषाने आणि त्वेषाने लढतात हेच मोठे दुर्दैव म्हणावे लागेल.

                     हल्लीची कलंकित राजकारणाची वलयांकित विधाने तारांकित प्रश्नांकडे दुर्लक्ष करायला लावत आहेत. आणि एक सजग जागृत मतदार म्हणून हे लोकांच्या लक्षात येत नाही ही शोकांतिका आहे. सध्याच्या राजकारणात केली जाणारी वक्तव्ये ही सूडबुद्धीने केलेली वाटतात. मनात द्वेष ठेवून केलेली वाटतात. पूर्वी मात्र असे नव्हते. एकमेकांबद्दल कितीही टोकाची विधाने केली तरी त्यात द्वेष दिसून येत नसे. एकमेकांच्या विरोधकांच्या वैयक्तिक जीवनाकडे किंबहुना कुटुंबीयांकडे कधीही बोट दाखवले जात नसे. माणूस मेला की वैर संपते तसेच निवडणूक संपली की हेवेदावे संपल्याची भावना तत्कालीन नेत्यांमध्ये होती. अनेक विधाने मैत्रीपूर्ण घेऊन नंतर त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली जात असे.

                                    याबाबत उदाहरण द्यायचे झाल्यास हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध. राजकीय सभेत एकमेकांवर टीकेची एकही संधी न सोडणारे वैयक्तिक आयुष्यात मात्र एकमेकांशी सुसंवाद साधत असत. बाळासाहेबांकडून पवारांना ‘मैद्याचे पोते’ म्हणून हिणवले गेले.  तर पवारांनीहीही बाळासाहेबांना ‘अडवाणींच्या फडातील नाचा’ म्हणत तोंडसुख घेतले. तशी पाहता त्या काळातील ही वक्तव्ये म्हणावी तेवढी साधी सरळ नव्हती. परंतु राजकीय सुसंस्कृत पणाच्या नावाखाली का होईना हेवेदावे तिथल्या तिथे सोडून दिले जात असत. मतभेद स्पष्टपणे दिसून येत असत पण मनभेद सहसा दिसून आले नाहीत. कारण यातील अनेक दिग्गज मंडळी ही सुसंस्कृत व सुशिक्षित होती. त्यामुळे राजकारणाचा पोत व्यवस्थित राखण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. आणि दुसरी महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्या काळात असणारी माध्यमांची मर्यादितता. आजचे वक्तव्य घराघरात पोहोचण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी वर्तमानपत्र चाळावे लागत असे. साहजिकच काही तासांचा अवधी निघून गेल्यामुळे त्या वृत्ताची तितकी परिणामकारकता दिसून येत नसे.

                        हल्ली मात्र आता व्यक्त केलेली प्रतिक्रिया काही सेकंदात व्हायरल होते.  सोशल मीडियाच्या विविध माध्यमांतून ती वाऱ्यासारखी प्रत्येकापर्यंत पोहोचते.  ती पोहोचते न पोहोचते तोवर त्यावर आलेली प्रत्यत्तरे धडाधड येऊन मोबाईलवर धडकतात. आणि मग खेळ सुरु होतो वाद-विवादांचा, आरोप- प्रत्यारोपांचा आणि चिखलफेकीच्या राजकारणाचा. परंतु यातून साध्य काय होते. कट्टर कार्यकर्यांनी राडा करत दाखवलेली तकलादू मर्दुमकी तोडफोड,जाळपोळ,हाणामारी ते कधी कधी दंगलीपर्यंत पोहोचते. आणि त्याने  सामाजिक स्वास्थ्याला ग्रहण लागून सर्वसामान्यांचे हाल होते. तर कधीकधी करमणूक वगळता हाती काहीही लागत नाही. खोटी चुकीची माहिती, अफवा, निंदानालस्ती, शिवराळ भाषा हेच भविष्यातील राजकारणाचे फलित असणार आहे का ? याचाही विचार व्हायला हवा. पुढच्या पिढीकडे आपण राजकारणाचा कोणता वारसा हस्तांतरित करणार आहोत यावरही चिंतन व्हायला हवे. आता कुठेतरी हे वादग्रस्त विधानांचे राजकारण थांबायला हवे. टीकाटिप्पणी व्हायला हवीच पण विकासाच्या आणि सामाजिक स्वास्थ्याच्या गोष्टींवर.

                       यासाठी राजकीय नेतृत्वाबरोबरच जनसामान्यांनीही प्रयत्न करायला हवेत. राजकीय नेत्यांच्या बेताल विधानांना किती महत्व द्यायचे आणि कसा प्रतिसाद द्यायचा यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!