राजकीय सिंहावलोकन ; आणि सध्याचे राजकारण

*2022-23 – राजकीय सिंहावलोकन*

पाहता पाहता २०२२ हे एक उत्तम वर्ष सरले. प्रत्येक क्षेत्राला या वर्षाने खूप काही दिले आणि बरेचसे हिसकावूनही घेतले. वेळेचा महिमाच असा आहे. किती भरले आणि किती उरले याचा हिशेब आता आपल्याला करावा लागणार आहे. २०२०-२१ कोरोनाच्या विळख्यातून गेले असताना २०२२ मात्र राजकीय उलथापालथींसाठी गाजले. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक भूकंप या वर्षाने घडवून आणले. कुणी अपेक्षेपेक्षा चांगले मिळवले तर कुणी अनपेक्षित धक्क्याने गमावले. हे सारेच राजकीय पटाला धक्के देणारेच होते. अनेक भविष्यकारांची भविष्यवाणी सपशेल चुकीची ठरविणारे हे वर्ष ठरले.
खरे तर वर्षाची सुरुवातच महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष यांच्यातील कुरबुरीने झाली. अनेक वर्षांची भाजपशी असणारी युती तोडून शिवसेनेने काँग्रेस- राष्ट्रवादी बरोबर केलेली महा विकासआघाडी भाजपला त्रासदायक ठरत होती. एकमेकांवर टोकाच्या टीका-टिप्पणीतुन मनास बोचणारी सल दिसून येत होती. देशाच्या सत्ताधारी पक्षासही यात जातीने लक्ष घालावे लागत होते. आणि यामुळेच या वर्षात राज्यातील राजकारणाने देशाच्या राजकारणालाही अक्षरशः ढवळून काढले होते. आम्ही पाच वर्षे यशस्वीपणे सत्तेत राहू अशी शास्वती देणाऱ्या महाविकास आघाडीला याच वर्षाच्या मध्यावर सुरंग लागला. आणि तिथून पुढे राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली. यानंतरही बरेच काही घडले मात्र काळ कोणासाठी थांबत नसतो. राजकारणात तर सख्खेही थांबायला तयार नसतात, तिथे इतरांची काय कथा? त्यामुळे अनेक वाईट घटनांच्या पार्श्वभूमीवर देखील वर्षभरात राजकारण मात्र आपल्याच गतीने पुढे जात राहिले. यातीलच काही लक्षवेधी घटनांचा हा थोडक्यात घेतलेला आढावा.

*ईडीच्या दारी ते जेलवारी-* गतवर्षात ‘ईडी’ ट्रेंडिंग मध्ये होती. राजकारणातील अनेक दिग्गजांना ईडीने अक्षरक्ष येड लावले. यात ईडीचा गैरवापर,सत्ताधाऱ्यांना अभय अशा अनेक अभ्यासाच्या बाजूही गाजल्या. मात्र १०० कोटींच्या मुद्द्याने चांगलाच जोर धरला. महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली. कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीनं अनिल देशमुख यांना अटक केली. आणि त्यानंतर पुढे अनेक महिने त्यांना जेलमध्येच मुक्काम करावा लागला. दुसरे म्हणजे महाविकास आघाडीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक हे मंत्री असतानाच जेलमध्ये गेले. नवाब मलिक यांना ईडीनं गोवावाला कंपाऊंडमधील जमीन खरेदीच्या व्यवहारात केलेल्या मनी लॉड्रिंग प्रकरणी अटक केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे संकटमोचक शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जेलमध्ये जावे लागले. त्यानंतर संजय राऊत यांना तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मंजूर करण्यात आला.

*निवडणुका आणि चुरस*- २०२२ मध्ये झालेल्या सर्वच निवडणुका चर्चेच्या ठरल्या. त्यात सुरुवातीला वर्षाच्या पहिल्या सत्रात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला होता. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 10 जागांची अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. यात भाजपला चार जागा मिळतील असा प्राथमिक
अंदाज होता. मात्र भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड या निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक पद्धतीनं विजयी झाले आणि काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला. यात काँग्रेसची मतं फुटल्याचीही जोरदार चर्चा झाली. यानंतर झालेल्या राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेची हक्काची आणि हातातली एक जागा भाजपनं जिंकली. सहाव्या जागेसाठी धनंजय महाडिक आणि संजय पवार यांच्यात झालेल्या लढतीत महाडिकांनी बाजी मारली. आणि यानंतर बराच मोठा हायहोल्टेज ड्रामा घडला. या वर्षात राज्यात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या (स्थानिक स्वराज्य संस्थेच्या) निवडणुकाही पार पडल्या. आणि सर्वच पक्षांनी आपल्या जागा कशा जास्त आल्या याचा कांगावा केला.

*गुवाहाटीतुन भूकंप हादरा महाराष्ट्रात* – राज्यसभेच्या निकालानंतर शिवसेनेचे खंदे शिलेदारच नॉट रिचेबल झाले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांच्या साथीनं शिवसेनेतून फारकत घेतली. 40 आमदारांना सोबत घेत शिंदेंनी गुजरातमार्गे सुरत गुवाहाटी गाठले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात परत येत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. आणि मी पुन्हा येईल हे शब्द सत्यात उतरून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असा कयास बांधला जात असतानाच एकनाथ शिंदेच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. आणि शिंदे सरकार भाजपच्या मदतीने सक्रिय झाले.

*वर्चस्वासाठी संघर्ष* – एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन गट पडले . नेमकी शिवसेना कोणाची ? यावरून सुरु असणारी कोर्टाची तारीख पे तारीख आणि रखडलेले निर्णय याने आजही दोन्ही गटांना ताटकळत ठेवले आहे. यादरम्यान झालेली शक्तिप्रदर्शने,दसरा मेळावा वाद, यात्रा,सभा, टीकाटिप्पणी , संघर्ष , हक्कवाद याने राजकीय धुळवडीत चांगलीच रंगत आणली.

*वाचाळवीरांचे अकलेचे तारे -* या वर्षात अजून एका विषयाने सर्वसामान्यांच्या तळपायाची आग मस्तकात पोहोचवली आणि ते म्हणजे नेत्याची बेभान आणि बेताल वक्तव्ये. एकमेकांविरुद्ध बोलताना मर्यादा न बाळगता केलेली टीकाटिपण्णी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली. यातही अनेकांनी तर चक्क राजकीय व्यासपीठावरून महापुरुषांची बदनामी करून जनतेत तीव्र संतापाची लाट निर्माण केली. यात राज्यपालांपासून ते सत्ताधारी आणि विरोधक सर्वांनाच जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले. एकूणच वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेली राजकीय चिखलफेक वर्षअखेरीसपर्यंत महापुरुषांच्या बदनामीपर्यंत कशी पोहोचली हे या वर्षी महाराष्ट्रातील तमाम जनतेने अनुभवले.

* *काय डोंगर काय खोके अन काय वाक्ये* – राजकारणातील घोषणा,विधाने किंवा काही वाक्ये ही कमालीची लोकप्रिय ठरत असतात. गेल्या वर्षीही अशीच काही वाक्ये कमालीची लोकप्रिय ठरली. मी पुन्हा येईल’च्या घोषणेला यश येण्यासाठीच्या प्रक्रियेत गुवाहाटीची घटना मैलाचा दगड ठरली. काय डोंगर,काय झाडी काय हाटील’ या वाक्याने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. यावर गाणेही रिलीज झाले. त्याचप्रमाणे ‘पन्नास खोके एकदम ओके’, या कथित आरोपाच्या ओळींनीही राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली. यासह अनेक वाक्ये सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रिय ठरली.

२०२२ मध्ये वरील लक्ष्यवेधी घटनानांसह अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडल्या. यात विविध वाद,निर्णय, आक्षेप आणि इतर अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळालया. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ हे वर्ष निश्चितच एक महत्वपूर्ण वर्ष ठरले यात काहीही शंका नाही. अनेक अनपेक्षित घटना आणि राजकारणातले अस्सल डावपेच यानिमित्ताने पाहायला मिळाले. कुठे ख़ुशी तर कुठे गम पाहायला मिळाला. तर कुठे सत्य तर कुठे भ्रम पाहायला मिळाला. परंतु वर्ष जरी संपले तरी राजकारणाचा हा अध्याय संपलेला नाही. २०२३ अजून काय काय घेऊन येणार आहे हे पाहणे नक्कीच रोचक ठरणार आहे. २०२३ वर्षात राजकारणात काहीही घडो परंतु राजकीय संस्कृतीला आणि जनतेच्या हिताला कुठेही धक्का लागायला नको एवढीच नागरिक म्हणून भाबडी आशा. बाकी येणाऱ्या नववर्षाच्या नव्या राजकीय धूळवडीसाठी मनपूर्वक शुभेच्छा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Need Help?
error: Content is protected !!