संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग:११🚩 स्वराज्याची ठिणगी

बालशिवबा हे सारं पाहत होता. आपल्या पुण्याच्या बदलत्या जहागिरीचे रूप डोळ्यांत साठवत होता. जिजाऊंचे न्यायनिवाडे पाहत होता. याबरोबरच निष्णात, पटाईत ढालाईत पट्टेकरी बालशिवबाच्या शिक्षणासाठी मांसाहेब जिजाऊंनी आणले होते. सायंकाळी लाल महालाच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चाले. सह्याद्रीच्या खोऱ्यातील मावळ्यांची मुले या मैदानी व मर्दानी खेळात भाग घेत असत.

 ओसाड, निर्मनुष्य पुण्यात मांसाहेबांनी सुधारणा घडवून आणल्या. पडकी देवळे दुरुस्त करून सकाळ-संध्याकाळ देवळात पूजा होऊ लागली. एकूणच पुणे माणसांनी गजबजून पुण्याचे रूप पालटले. परंतु जेव्हा प्रथमच शिवराय मांसाहेबांसोबत पुण्यात आले होते, तेव्हा त्यांनी पुण्याची दैन्यावस्था डोळ्यांनी पहिली होती. शिवराय जरी लहान होते तरी विचार व कृतीने ते अतिशय प्रौढ होते. 


                 शिवराय मांसाहेबांना महाराष्ट्रातील एकंदर परिस्थितीबाबत जेव्हा विचारत, तेव्हा मांसाहेब म्हणत, ” खरं म्हणजे आपला महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषा अन मराठी मनाचा मावळ महाराष्ट्र, भक्तीच्या शक्तीच्या पैलतीरीचा महाराष्ट्र, मातीमध्ये धुमसणाऱ्या तेजोमय कुमकुम रक्तकरंडकाचा महाराष्ट्र, पोलादी छातडांच्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र, “गर्जा महाराष्ट्र” म्हणून मराठ्यांचा स्वाभिमानी महाराष्ट्र. पण शिवबा हाच महाराष्ट्र पहुडला आहे निपचित- निश्चित ग्लानी आल्यासारखा. इथे कोणासही शिवधर्माचा व स्वराज्याचा अभिमान नाही. मोगल, निजाम व आदिलशाहीपुढे आपला महाराष्ट्र झुकला आहे, वाकला आहे. आपली रयत, प्रजा अत्याचाराने पिडलेली व दारिद्र्याने लडबडलेली आहे.”                                         यांवर जिज्ञासू शिवरायांनी मांसाहेबाना प्रतिप्रश्न केला, ” मांसाहेब असे का? या महाराष्ट्राला, रयतेला, प्रजेला अत्याचारातून, दारिद्र्यातून बाहेर काढणारे कोणीच नाही का?”                                     ” नाही शिवबा, यांची काळजी घेणारं कोणीच उरलेलं नाही. ते स्वतःच त्यांच्या काळजीत आहेत.” मांसाहेब उत्तरल्या.                                      “मग पुढे रयतेचे काय?” शिवराय काळजीच्या स्वरात म्हणाले.                                    मांसाहेब म्हणाल्या, “शिवबा, रयत फक्त खचलेली आहे पण घाबरलेली नाही. अजूनही इथल्या घराघरापर्यंत जा. या घरातील माऊली सांगत असते, ‘इडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे’ तिला अजूनही वाटत बळीचं राज्य येईल. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं राज्य येईल.”                                      ” मांसाहेब, हा बळीराजा कोण?” शिवराय अधीरतेने म्हणाले.                                    “मराठ्यांचा राजा, शेतकऱ्यांचा राजा. याच्या राज्यात रयत सुखी- समाधानी होती. पण या बळीराजाच्या डोक्यावर मोगल, निजाम, आदिलशहाने त्यांच्या जहागीरदारांनी – वतनदारांनी पाय ठेवला अन बळीराजाचं राज्य हिरावून घेतलं. तेव्हापासून रयत पोरकी झाली.” मांसाहेब चिंतेच्या स्वरात म्हणाल्या.                                     मुठी वळलेला शिवबा तत्क्षणी म्हणाला, “मांसाहेब, मी होईन तो बळीराजा, मी मिळवीन शेतकऱ्यांचं राज्य.”                                   शिवबाच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द एकूण मांसाहेबांना आनंद झाला.कारण शिवबाच्या मनी स्वातंत्र्याची, स्वराज्याची ठिणगी पेटली होती. ही स्वराज्याची ठिणगी अन्याय, अत्याचार व दारिद्र्याचा वणवा करून रयतेला सुखी- समाधानी व आनंदी करेल यात तिळमात्रही शंका मांसाहेबांना नव्हती.                                अशातच एके दिवशी फलटणचे मुधोजीराव निंबाळकर पुण्याला आले. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैदेत ठेवले होते. शहाजीराजांनी त्यांची कैदेतून सुटका करून फलटणची जहागीर पूर्ववत मिळवून दिली होती. म्हणून ते  सात-आठ वर्षाची मुलगी सईला व मुलगा बजाजीला घेऊन लालमहाली जिजाऊंना भेटण्यासाठी आले होते. गव्हाळ रंग असूनही सईबाईचा रूपाचा गोडवा नजरेत भरण्यासारखा होता. धारदार नाक, पातळ ओठ,  रेखीव काळे डोळे, उंच मान चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालत होते. 
               मुधोजी थोडे दिवस पुण्यात राहिले. सईबाई जिजाऊंना खूप आवडली होती. मुधोजींकडे जिजाऊंनी सईबाईची मागणी घातली. मुधोजींनी आनंदाने संमती दिली. बंगलोरला तातडीने शहाजीराजांना खलिता पाठवण्यात आला.                 

इकडे शहाजीराजे रणदुल्लाखानासोबत  कर्नाटकात आल्यानंतर शहाजीराजांनी दक्षिणेत अनेक स्वाऱ्या केल्या. विजयावर विजय ते मिळवू लागले. पराभूत झालेली राज्ये साफ बुडवून टाकण्याचे धोरण मात्र शहाजीराजांनी ठेवले नव्हते. पराभूत झालेली राज्ये टिकवण्यावर शहाजीराजांचा विशेष भर होता. खंडण्या, तह, करार, मांडलिकत्व देऊन पराभूत राज्ये राखण्याची धडपड शहाजीराजांनी केली. परिणामी दक्षिणेतील राज्यातील लोकांत शहाजीराजांची प्रतिमा झळाळाली . जनमानसातील शहाजीराजांबद्दलचा वाढता आदर व लोकप्रियता लक्षात घेऊन दक्षिणेतील राजांनी बंगळूर हे शहर  शहाजीराजांना प्रेमपूर्वक भेट दिले होते.                                            शहाजीराजांनी शिवराय- सईबाई यांच्या लग्नाला होकार दिल्याचा खलिता आल्यानंतर लग्नाचा मुहूर्त काढून शहाजीराजांना कळवला गेला. शहाजीराजे लग्नाला येणार होते पण अचानक एका मोहिमेत गुंतल्यामुळे शहाजीराजे लग्नाला येऊ शकले नाहीत.वाजत- गाजत, आनंदात सर्व प्रजेच्या साक्षीने १७ एप्रिल १६४० रोजी शिवराय- सईबाई विवाह थाटामाटात संपन्न झाला.                                                

✍ लेखन:- श्री. चंदन पवार (उपशिक्षक) 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा
Tags

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close