पुणे-लोणावळा लोकल येत्या गुरुवारपासून पुन्हा रुळावर.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी परवानगी

लोणावळा : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून ठप्प असलेली पुणे-लोणावळा लोकल ट्रेन आता सुरु होणार आहे.
ट्रेन सुरु होणार ही जरी आनंदाची बातमी असली तरी तूर्तास केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची अनुमती मिळणार आहे. त्याबाबतची नियमावली आगामी दोन पुण्याचे पोलीस आयुक्त जाहीर करतील, अशी अपेक्षा आहे.

राज्यात आणि देशात सध्या अनलॉक 5 सुरु झाले आहे. या अनलॉक 5 च्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता काही निर्बंधांसह पुणे परिसरातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
मिशन बिगिन अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आदेशात यासंदर्भातील उल्लेख आहे. मुंबई महानगर क्षेत्राच्या धर्तीवर पुणे क्षेत्रातील लोकल ट्रेन सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.
यामुळे पुणे- लोणावळा या लोहमार्गालगत राहणाऱ्या लोकांसाठी ही दिलासादायक बाब आहे. राज्य शासनाने अनलॉक 5 ची नियमावली आणि आदेश जाहीर केले आहेत. हा अनलॉक 5 हा 1 ते 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. यामध्ये राज्यातील लांब पल्ल्याच्या रेल्वे देखील सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.
पुण्यातील लोकलसेवा सुरू करतानाच कोरोनाच्या अनुषंगाने काळजी, खबरदारी घेण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.