संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग: ८६🚩शिवराय – औरंगजेब मैत्रीचा तह…

पुरंदरच्या तहाने स्वराज्य अर्धे झाले होते. मिर्झाराजे औरंगाबादहून दिल्लीला रवाना झाले होते. मोगलांचे काही सरदार थोड्या शिबंदिनीशी स्वराज्यात ठाण मांडून होते. अशा वेळी जर आपण बंड केले तर आदिलशाही, कुतुबशाही व मोगलशाहीचे वैर आपणांस परवडणार नाही.. म्हणून शत्रूला मित्र करावे.. त्यामुळे जी उसंत मिळेल त्याचा फायदा घेऊन आपले बळ वाढवावे असा शिवरायांनी विचार केला. पुरंदरच्या तहानुसार आम्ही आपल्याशी आजही इमान राखून आहोत हे दाखविण्यासाठी शिवरायांनी बाळाजी आवजी यांच्याकडून मैत्रीचा तह करण्याबाबतचे पत्र लिहले आणि ते पत्र दिल्लीला रवाना केले.


                     स्वराज्य उभारणीबरोबर स्वराज्य रक्षणाचाचाही विचार करायला हवा या हेतूने शिवरायांनी स्वराज्याच्या चारही बाजूने भक्कम तटबंदी करण्याचे ठरवले. सिंधुदुर्ग व रायगडचे काम चालूच होते. पायदळ, घोडदळ व आरमाराची बांधणी व व्यवस्था लावली. किल्ल्यांची, फौजेची व्यवस्था लावली. राजांनी आपल्याजवळील फौजेला काही नियम घालून दिले. “दसरा होताच फौजेने आठ महिने परमुलुखात कूच करावी.. खंडण्या वसूल कराव्यात.. पुन्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला स्वराज्यात परत यावे..लष्करात असतांना कोणीही लुटीचा माल लपवू नये.”


                      तिकडे कर्नाटकात व्यंकोजीराजांचा कारभार वाढतच होता . शहाजीराजे व जिजाऊंनी ठरविल्याप्रमाणे व्यंकोजीराजे व शिवाजीराजांची वाटचाल सुरू होती. शहाजीराजांच्या मृत्यूनंतर या दोन्ही भावांची भेट नव्हती. फक्त दूतांमार्फत समाचार घेणे- देणे सुरू होते. वडीलकीच्या नात्याने शिवाजीराजे व्यंकोजीराजे यांना योग्य सल्ला व मदतही करत. व्यंकोजीराजेही जिजाऊ व शिवरायांच्या आदेशांचे पालन करत . व्यंकोजीराजांनी तंजावर – जिंजीपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केलेला होता.


                     औरंगजेब बादशहाच्या नजरकैदेतुन शिवराय व शंभूराजे राजगडावर सुखरूप पोहचल्याची बातमी मिळताच व्यंकोजीराजांनी राज्यभर आनंदोस्तव साजरा केला. याशिवाय आदिलशहा व कुतुबशहाने शिवरायांना वेळोवेळी मदत केल्याने आभाराचा खलिता पाठवून दिलेल्या सहकार्याबद्दल व्यंकोजीराजेंनी कृतज्ञता व्यक्त केली. मोगल आपले सामायिक शत्रू आहेत व शिवाजीराजे मोगलांविरुद्ध लढत आहेत म्हणून आपण शिवरायांची पाठराखण करावी हे व्यंकोजीराजांनी आदिलशहा व कुतुबशहास पटवून दिले होते.


                      जानेवारी १६६७ मध्ये व्यंकोजी राजे पत्नी दिपाराजेंसह राजगडावर शिवरायांच्या भेटीसाठी आले. सुमारे दोन महिने महाराष्ट्रात राहून , स्वराज्याचा अभ्यास करून आणि शंभुराजेंकडून राजनीतीचे धडे घेऊन व्यंकोजीराजे होळीच्या दरम्यान महाराष्ट्रातून कर्नाटकात जायला निघाले. ” आम्ही उत्तरेपर्यंत जाऊन आलो , तुम्ही पूर्ण दक्षिण सांभाळा. स्वतंत्र राजे व्हा. आपण दोघे मिळून भारताला समतेचे राज्य देऊ.” असा शिवाजी महाराजांनी व्यंकोजीराजांना सल्ला दिला. आदिलशहा व कुतुबशहा यांना मोगलांपासून दूर ठेवण्यात व्यंकोजीराजेंनी जे राजनैतिक कौशल्य दाखवले होते त्याबद्दल शिवरायांनी व्यंकोजीराजेंचा गौरव केला. शेवटी जिजाऊ व शिवरायांचे दर्शन घेऊन व्यंकोजीराजे पत्नी दीपाराजेंसह कर्नाटकाकडे मार्गस्थ झाले.


               शिवरायांना चिरडून टाकणे शक्य नाही हे औरंगजेबाला पुरते कळले होते.  शिवाजी महाराजांसोबतचे वैर परवडणारे नव्हते म्हणून त्याने शिवरायांशी मिळतेजुळते घेण्याचे ठरवले. औरंगजेब वायव्य प्रांत व बंगालमुळे त्रस्त होता. याशिवाय त्याच्या कुटुंबातील कलह वाढला होता. आपला मुलगा मुअज्जमला औरंगाबादचा सुभेदार म्हणून त्याने नेमले . मुअज्जमने शिवरायांशी- मराठयांशी वाटाघाटी करून घडवून आणलेल्या मैत्रीच्या तहाला औरंगजेबाने मान्यता दिली. तद्नंतर औरंगजेबाने ९ मार्च १६६८ ला पत्र लिहून शिवरायांना “राजा” ही पदवीही दिली. पुरंदरच्या तहाव्यतिरिक्त बादशहाकडे असलेल्या मुलुखातुन एक लाख होनांचे उत्पन्न शिवरायांना देण्याचे औरंगजेबाने मान्य केले होते. याशिवाय देशमुखी वसूल करण्याचीही परवानगी राजांना मिळाली होती.


               औरंगजेबाशी झालेल्या तहाने शिवरायांना खूप बरे वाटले.. या तहामुळे राजांना स्वराज्यासाठी वेळ देता येणार होता. राजांनी आपल्या स्वराज्याच्या जमिनीची प्रतवारी ठरवून महसुलाची व्यवस्था लावली.. संभाजीराजांना मिळालेल्या बादशाही मनसबीतून फौजेचा खर्च भागवणेही शक्य झाले होते.


                       औरंगजेबाचा पुत्र मुअज्जम आता औरंगाबादचा सुभेदार झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या नजरकैदेतून सुटल्यावर महा संशयखोर औरंगजेबाने रामसिंगाची मनसब जप्त केली. त्यांना दरबारात येण्यास मनाई करण्यात आली होती. ही बातमी मिर्झा राजांना दक्षिणेतून कळल्यावर त्यांना खूप दुःख झाले. औरंगजेबाला आता संशय येत होता की मिर्झाराजे व शिवाजी एकत्र झाले असून आदिलशाहीच्या मदतीने ते मोगलशाहीवर हल्ला करतील. म्हणून अत्यंत गुप्तपणे औरंगजेबाने मिर्झाराजे यांची हत्या करण्याचे नियोजन केले. यासाठी औरंगजेबाने मिर्झाराजे यांचे अत्यंत विश्वासू सल्लागार उदयराज मुन्शीची गुप्तपणे मदत घेतली.


                 औरंगजेबाच्या मनातील संशयाचे प्रकरण सावरण्यासाठी मिर्झाराजे अत्यंत वेगाने दिल्लीला जाण्यासाठी निघाले. बीडहुन कूच करून ते औरंगाबादला पोहोचले होते. औरंगाबादहून मिर्झाराजे बुऱ्हाणपूरला आले. दिनांक २८ ऑगस्ट १६६७ रोजीच्या रात्री बुऱ्हाणपूर येथे मिर्झाराजे जयसिंग यांची उदयराज मुन्शी यांनी विष देऊन हत्या केली. मिर्झाराजेंची छत्री तापी नदीच्या काठावर आहे. तिला “राजा जयसिंग की छत्री” असे म्हणतात. मित्रहो, येथे एक विचार मनात येतो.. जर मिर्झाराजे जयसिंग यांनी छत्रपती शिवरायांना मदत केली असती तर इतिहास नक्कीच वेगळा राहिला असता….   

                                 औरंगजेबाच्या तहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण भागाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. आदिलशहाच्या ताब्यात असलेला रांगणा किल्ला त्यांनी सर केला. रांगणावरील विजयाने राजांच्या फौजेची गमावलेली अस्मिता परत जागृत झाली. यानंतर राजे नव्या उत्साहाने पुन्हा वावरू लागले. राजगडावर शस्रशाळेत नवीन शस्त्र तयार होऊ लागली. फौजेत नवीन भरती केली जात होती. पागेतल्या घोड्यांची संख्या वाढू लागली. बाहेरच्या पावसाची तमा न करता राजे अंतर्गत व्यवस्थेच्या कारभार करत होते.  राजांच्या मनातल्या विचारांना आकार मिळत होता. त्यानंतर राजांनी कोकणात फेरफटका मारून देसायांचा बंदोबस्त करायचे ठरवले.


              रांगण्याचा पराभवाने धास्तावलेल्या आदिलशहाने राजांशी मित्रत्वाचा तह करून वार्षिक तीन लक्ष रुपयांची खंडणीही मान्य केली. यामुळे राजांचा फौजेचा खर्च भागणार होता. आदिलशाहीशी मैत्रीचा तह झाल्याने कोकणातील देसायांचा प्रश्न राजांनी निकाली काढायचा ठरवला.


           कोकणचे देसाई राजांना सदैव उपद्रव करत. राजांच्या मुलुखात दांडगाई करत. राजांचे सैन्य येताच आपला भाग सोडून गोव्याच्या आश्रयाला जात. गोव्याचे फिरंगी मस्तवाल झाले होते. स्वराज्यात येऊन लोकांवर जुलूम करत. नुकताच फिरंगी विरजईनं हिंदूंनी बारदेशातून दोन महिन्यात निघून जावं असा हुकूम काढला होता. सात हजार हिंदूंना जुलमानं बाटवण्यात आलं होतं. या फिरंग्यांचे असेच लाड  सुरू ठेवले तर उद्या हिंदू धर्म उरायचा नाही म्हणून देसायांचा बंदोबस्त करायला गेल्यावर जर देसाई बारदेशात घुसले तर बारदेश बेचिराख करायचा..असा विचार करून राजे कोकणच्या स्वारीवर फौजेसह निघाले.


                    राजांच्या अपेक्षेप्रमाणे राजे येत आहेत हे पाहताच कोकणच्या देसायांनी बारदेशात आश्रय घेतला. राजांना हेच हवे होते. राजे त्वरेने बारदेशात घुसले. आडव्या झालेल्या धर्मोपदेशकांचीही राजांनी गय केली नाही. चार पाद्रीना कंठस्नान घालून जाळपोळ करत राजे पुढे सरकत होते. राजांनी तीन दिवसात अनेक खेडी बेचिराख केली. पोर्तुगीज सैन्य व त्यांचे आरमार यांची भिती न बाळगता सुमारे तीनशे लोकांना कैद केले. तेव्हा कुठे बारदेशकरांचे डोळे उघडले. राजे डिचोलीला थांबलेले असताना पाद्री गोंसालू व रामोजी कोठारी शेणवी तहाची बोलणी करण्यासाठी आले. राजांना जास्त काळ बारदेशात थांबणे शक्य नसल्याने त्यांनी तहाला मान्यता दिली व राजगडावर आले. यामुळे कोकण देसायांचा बारदेशाशी असलेला आश्रय तुटला. राजांनी पकडलेले कैदी मुक्त केले. बारदेशकरांच्या वाढत्या धर्मांतराला पायबंद बसला. पोर्तुगीजांबरोबर इंग्रजही राजांच्या बारदेश स्वारीने धास्तावले.       

        
           ✍ लेखन: चंदन पवार (

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close