संस्कृती

शिवछत्रपती भाग : ८५🚩नेताजी पालकरांचे धर्मांतर…🚩

असरचा नमाज बादशहाने आपल्या खासगी महालातच पढला. नमाज पढण्यासाठी त्याने वजीर जाफरखान, खान जहान लोधी, दिलावरखान उझबेग, दाऊदखान कुरेशी, नवाब फिदाई हुसेन खान, महाबतखान, आग्र्याचा किल्लेदार रादअंदाझखान, कोतवाल, सिद्दी फुलादखान, गाझी बेग, शाही हकीम मुल्ला सय्यद अहमद नूरानी, दिल्लीचा शाही इमाम मौलाना मुफ्ती अफजल सईद महम्मद झरदारी, मोती मशिदीचा पेश इमाम मौलाना मसूद अहमद कुरेशी आणि अन्य काही विश्वासू दरबारी, सरदार, धार्मिक विद्वान काझी वगैरेंना बोलावून घेतले होते. शाही इमामाच्या मागे नमाज पढून झाला. बादशहा लोडाला टेकून बसला. नजर छतावर खिळलेली होती . हातातील जपमाळेचे मणी झरझर सरकत होते.  बऱ्याच वेळाने हिरवी नजर खाली उतरली आणि सिद्दी फुलादखानावर स्थिर झाली.” सिद्दी फुलादखान अखेर तुझ्या प्रयत्नांना यश आले. परमदयाळू परवरदिगार अल्लाने काफिर नेताला इस्लामच्या खऱ्या आणि सच्च्या मार्गावर येण्याची सद्बुद्धी दिली. तुझी सेवा अल्लाच्या दरबारात निश्चितच रुजू होईल..”

              ” आपल्या कृपेचेच हे सारे फळ आहे आलमपन्हा… नाहीतर या नाचीज गुलामाला ते कुठले शक्य व्हायला…!
              ” पण मला हे कळत नाही… कालपर्यंत जिवाची पर्वा न करणारा नेताजी आज नेमका आमच्यासमोर पेश होण्याच्या दिवशी अचानक धर्म बदलण्याची कबुली देतो हे जरा कुठेतरी खटकते… यामध्ये त्या हरामजाद्याचा आणि त्याचा जुना मालिक, शिवाचा काही डाव असावा असा मला संशय आहे. ह्या मराठी भुतावळीला मी चांगलेच ओळखतो… ते इतक्या सहजासहजी नमणारे नाहीत. याच्यावरचे पहारेकरी नीट पारखून घेतलेले खात्रीचे आणि विश्वासातले आहेत ना? काही दगा किंवा फंदफितुरी नाही ना याची नीट चौकशी आणि खात्री करून घे.. बाकी पाखरूसुद्धा त्याच्या आसपास फिरकू शकणार नाही असा चोख बंदोबस्त ठेव..”.


                   ” प्रत्येक शिपाई मी स्वत: पारखून घेतलेला, खात्रीचा आहे. सगळे माझे बिरादर आणि जातभाईच आहेत….”
                  ” ठीक आहे. ! जसा सिद्दी जौहरला तह करण्याचे आमिष दाखवून गाफील केला गेला..दीड लाख फौजेचा गराडा फोडून जो शिवा लाल महालात शिरतो आणि आमच्या मामूजानची बोटे तोडतो आणि वर राजरोसपणे सुखरूप निसटून जातो… जो तुझ्या तोफा आणि पाच हजार जांबाज हशमांच्या वेढ्यातून गायब होतो.. तो शिवा किंवा त्याची माणसे या किल्ल्यात घुसणे अशक्य नाही… अचानक छापा मारून ते त्यांचा माणूस सोडवून नेतात. त्यांना आजच रात्री त्या काफिराला कलमा पढवला जाईल. आत्ता, या क्षणापासून किल्ल्याचे चौक्या-पहारे दुप्पट वाढवून कडक कर… तटावर फिरती गस्त ठेव… दर दहा-पाच पावलांवर एक तिरंदाज व बंदूकधारी उभा ठेव.. प्रत्येक कमानीवर तीर लावलेला आणि प्रत्येक बंदूक, प्रत्येक तोफ ठासून सज्ज ठेव… फुलादखान, पूर्ण शहरात नाकेबंदी जारी कर… तुझी आणि रादअंदाझची पथके शहरापासून पाच कोस दूरपर्यंत फिरती ठेव… बेड्या तोडल्या असल्या तरी कैद्यावर सख्त पहारा तसाच जारी ठेव… मशिदीच्या सभोवती किल्लेदाराचे पहारे असतील पण आतसुद्धा तू तुझे सावध पहारे जारी ठेव… नमाजासाठी आमच्या मागे असणारे मानकरी हत्यारबंद राहतील…काफिराने इस्लाम कबूल केला तरी पुढचा हुकूम होईपर्यंत सख्त पहारे तसेच जारी राहतील… ”                        बादशहाचे बोलणे संपल्यावर पटापट मुजरे घालीत सारे बाहेर पडले. महालाबाहेर पाऊल टाकताच शाही इमामाच्या मुसक्या आवळल्या गेल्या.


                    बादशहाच्या हुकमाचा  अमल लगोलग सुरू झाला. जागोजाग चौक्या बसल्या. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची चौकशी सुरू झाली. फुलादखानाच्या माणसांनी मोठ्या प्रमाणात धरपकड केली. शहरात जणू अघोषित संचारबंदीच लागू झाली. घराघरांतून नेताजींच्या छळाच्या खऱ्या-खोट्या चर्चा आणि धर्मांतराची कुजबुज सुरू झाली. शहरातच नव्हे तर शहराभोवती स्वारांची दौड सुरू झाली. लाल किल्ल्याच्या तटा-बुरुजांवर गस्त सुरू झाली. रादअंदाझखानाच्या शिपायांनी मोती मशीद घेरली होती. नमाजासाठी येणाऱ्या मोठमोठ्या अमीर-उमरावांचीसुद्धा कडक तपासणीतून सुटका नव्हती. मशिदीच्या आत सिद्दी फुलादखानाचे कडवे हबशी खांद्यावर नंग्या तेगा घेऊन भिंतीला चिकटून उभे होते. मशिदीचा प्रत्येक कोपरा त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होता. गांजा पिऊन लालभडक झालेले डोळे अधिकच तांबारून सिद्दी याकूत सख्त देखरेख करीत होता.


                रात्र पडू लागली. ईशाच्या नमाजाला घटकाभराचाच अवधी उरला. मोती मशिदीत ईदचा माहोल होता. मगरीबच्या नमाजासाठी आलेला बादशहा आपल्या जागेवरच बसून होता. अत्यंत विश्वासू दरबारी बादशहाच्या मागच्या रांगेत पायाशी नंग्या तलवारी ठेवून उभे होते.

बादशहाच्या डावीकडे मध्ये चार हातांचे अंतर ठेवून जरीच्या कलाबतूचे काम केलेला एक मखमली मुसल्ला अंथरलेला होता.
                   नव्या कोऱ्या मुघली पोशाखातील नेताजींना मोती मशिदीत आणले गेले. सिद्दी फुलादखान त्यांच्या जोडीने चालत होता. विजयाचा आनंद त्याच्या डोळ्यांत मावत नव्हता. छाती पुढे काढून चालताना इकडेतिकडे कटाक्ष टाकीत लोकांच्या नजरेतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा तो अंदाज घेत होता. नेताजींच्या हातीपायी बेड्या नसल्या तरी तळपते भाले आणि नंग्या तलवारी घेतलेल्या हशमांचा गराडा कायम होता. मारहाण, अतोनात छळ आणि उपासमार, त्यातच प्रचंड मानसिक तणाव यामुळे नेताजींच्या अंगात उभे राहण्याचेसुद्धा त्राण नव्हते..


               नेताजींना बादशहासमोर उभे केले गेले… त्यांच्याकडे पाहून आलमगीर बादशहा चक्क मंद स्मित करीत होता. गेल्या कित्येक वर्षांत त्याच्या चेहऱ्यावर कोणी स्मितरेषा पाहिली नव्हती. आजचा योगच मुळी अपूर्व आणि दुर्मीळ होता. शरीरातून उठणाऱ्या वेदना दाबून धरून आणि चेहऱ्यावर हास्य आणून नेताजींनी कंबरेतून वाकून बादशहाला तीन वेळा कुर्निसात केला. बादशहाची हिरवी गहरी नजर एकटक रोखून बघत होती. मग एक अत्यंत दुर्मीळ घटना घडली. नेताजींच्या कुर्निसातचा बादशहाने मान झुकवून स्वीकार केला आणि शेजारच्या मखमली चटईवर बसण्याचा हाताने इशारा केला. इमामाने पुढे होऊन नेताजींना बसण्याचा इस्लामी तरीका समजावून सांगितला. इतकेच नव्हे तर पश्चिमेकडे मोहरा करून त्यांना नीट बसवून घेतले. नेताजी मोठ्या शिकस्तीने ते विशिष्ट पद्धतीचे आसन घालून बसले.


             दरबारी अमीर-उमरावांनी मशीद गच्च भरली होती. सारे हात बांधून स्तब्ध उभे होते. नेताजींना सर्वांत पहिल्या रांगेत बसविल्याने मागे कोणकोण आहेत हे समजत नव्हते. प्रत्यक्ष बादशहा शेजारी बसलेला असल्याने मागे वळून पाहणे शक्य नव्हते. त्यांना समोर फक्त मेहराबचा महिरपी कोनाडा, त्याच्या शेजारचे खुतबा पढण्याचे मौलवी आणि शेजारी उभा असलेला पेश इमाम एवढेच दिसत होते. आज पेश इमामाच्या दोन्ही बाजूंस हत्यारबंद हशम उभे होते. मागच्या रांगेतल्या उमरावांच्या नजरा नेताजींवर रोखलेल्या होत्या. त्यांची प्रत्येक हालचाल आणि चेहऱ्यावरचे बदलते भाव ते अतिशय बारीक नजरेने टिपत होते. नमाज पढतानासुद्धा नजर ढळू न देण्याची त्यांना ताकीद होती. दग्याफटक्याचा संशय जरी आला तरी विजेच्या वेगाने तलवार उचलून चित्त्याच्या चपळाईने ती चालविण्यास ते अगदी सिद्ध होते.


            नेताजींनी डोळे मिटून घेतले. मिटल्या डोळ्यांसमोरून रोहिडेश्वराच्या शपथेपासून विशाळगडावरच्या प्रसंगापर्यंतची दृश्ये क्षणात तरळून गेली. आईसाहेबांचा करारी तरी वत्सल, आश्वासक सोज्ज्वळ चेहरा आणि महाराजांची भव्य मूर्ती दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर खिन्न स्मित होते. एका डोळ्यात चिंता, तर दुसऱ्या डोळ्यात आश्वासन तरळत होते. महाराजांच्या मागून खंडेराया आणि भवानी आई वरदहस्त उंचावून मंद हसत होते. नेताजींच्या शरीराचा कणन् कण आणि मनाचा कोपरान् कोपरा टाहो फोडून महाराजांना सांगत होता–‘महाराज, तुमची आज्ञा म्हणून स्वराज्यासाठी हे दिव्यसुद्धा करण्यासाठी मी आनंदाने सिद्ध झालो आहे. आता तुम्हीच माझे तारणहार… आपले नजरबाज थेट आदबखान्याच्या तळघरात शिरकाव करून घेऊ शकतात.. तर ते हर प्रयत्न करून मला या नरकातून सोडविल्याशिवाय राहणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे… आई जगदंबे, माझ्या राजाच्या पायाशी परत जाण्याची..त्यांची आज्ञा पूर्णत्वाला नेण्याची मला शक्ती दे…’डोळ्यांत भरून येणारे पाणी त्यांनी महत्प्रयासाने परतविले. शरीर वेदनांनी ठणकत होते. मन आक्रंदत होते. कुठल्याही क्षणी शुद्ध हरपेल असे वाटत होते. पण त्यांनी मोठ्या कष्टाने स्वत:ला सावरून ठेवले होते. त्यांच्या खांद्याला हलकासा स्पर्श झाला. त्यांनी हलकेच डोळे उघडले. पेश इमाम त्यांचे लक्ष बादशहाकडे वेधत होता.


                तद्नंतर नेताजींना शाही इतमामात इस्लाम धर्माची दीक्षा देण्यात आली.. आणि नेताजींचे नवीन इस्लामी नामकरण झाले.. “कुलीखान… महम्मद कुलीखान…”
                 इस्लाम स्वीकारल्यावर नेताजींना घेऊन जाण्याची आज्ञा झाली..नेताजी उठून उभे राहण्याचा प्रयत्न करू लागले. शेजारच्या उमरावाने आधारासाठी हात दिला…पण शारीरिक विकलता आणि आत्यंतिक मानसिक तणाव यामुळे दुर्बल झालेले नेताजी अहं आता महम्मद कुलीखान धाडकन खाली कोसळले. बादशहाच्या नजरेचा इशारा समजून सिद्दी याकूत शिपायांसह पुढे झाला. बेशुद्ध झालेल्या कुलीखानाला उचलून त्याने जलदीने मशिदीबाहेर नेले..


                     तद्नंतर नेताजींना शुद्ध आली तेव्हा ते शाही बिछान्यावर होते.. त्यांच्या सेवेला स्रिया होत्या.. महिने-दोन महिने नेताजींची तब्बेत बरी व्हायला लागले.. कपटी, धूर्त औरंगजेबाने नेताजींची रवानगी पुढे स्वराज्यापासून दूर अशा काबूल- कंदाहार प्रांतात केली.
         ✍  लेखन: चंदन पवार 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close