पुण्यात चारचाकीतून प्रवास करताना मास्कची गरज नाही, परंतु ही असेल अट….

राज्यात आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क वापरणे अनिवार्य केले होते. यात अनेक शहरांत तर विनामास्क फिरणाऱ्यांवर दांडात्मक कारवाईचे सत्रदेखील सुरु होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि कोरोनावरील लस आल्याने या नियमामध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महत्वपूर्ण ट्वीट केले आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, चारचाकी वाहनात कुटुंबियांसोबत प्रवास करताना मास्कची गरज नाही. कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनातून पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल.’ यासाठी एक अट यात टाकली आहे. ती म्हणजे ‘ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात’.
यापूर्वी मुंबईत देखील अशीच घोषणा करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पाठोपाठ आता पुण्यातही चारचाकीमध्ये मास्क घालण्याची सक्ती असणार नाही. हा चारचाकीतून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मानला जात आहे.