संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग : ८४🚩 नेताजींचा धर्मांतरासाठी होकार…

दोन महिने असेच निघून गेले.” सरनोबत.. सरनोबत.. सरकार जागे व्हा.” 
            आग्र्याच्या या भयाण तळघरात इतके दिवस उलटून गेल्यानंतर आता कोण मला सरनोबत म्हणून हाक मारणार? हा नक्कीच भास असणार. बहुधा आपल्या मनाचा समतोल बिघडत असल्याचीच ही निशाणी असली पाहिजे. असे नेताजींना वाटत असतानाच पुन:पुन्हा त्याच हाका ऐकू येत राहिल्या. हाकांमधील आर्त अधीरता वाढत गेली.


             ग्लानीत असलेल्या नेताजींनी मोठ्या कष्टाने कसेबसे अर्धवट डोळे उघडले. तोच त्यांना कोठडीच्या गजांपाशी बसून दबक्या आवाजात हाका मारणारा सिद्दी शिपाई दिसला.. त्यांना उठविण्याचा प्रयत्न करीत होता. जखमा झालेल्या हातांनी कसेबसे गज पकडून नेताजी अर्धवट बसते झाले. त्या शिपायाने पाण्याची हलकी धार त्यांच्या तोंडावर धरली. अधाशीपणे घटाघटा त्यांनी मिळाले तेवढे पाणी पिऊन घेतले.


              तो शिपाई हलक्या, दबक्या पण स्पष्ट शब्दांत पुन्हा सांगू लागला,” सावध व्हा सरनोबत.. सावध व्हा… मी सांगतो ते नीट ऐका.. मी सिद्दी हिलालच्या तुकडीतला शिवाजी महाराजांचा माणूस आहे. महाराजांच्या आज्ञेप्रमाणे दिलेरखानाच्या छावणीपासून हर प्रयत्न करून आपल्या आसपास आहे. मी बहिर्जी नाईकांच्या पथकातला नजरबाज आहे. त्यांचा खबरी म्हणूनच मी तुमचा पहारा मिळवला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या मनगटावरचे हे गोंदण बघून खात्री करून घ्या…”


                   तो सिद्दी शिपाई उठला आणि भिंतीवर अडकविलेली दिवटी घेऊन आला. अस्तनी मागे सारून त्याने मनगट उघडे केले आणि दिवटीजवळ धरले. दिवटीच्या हलत्या प्रकाशात बहिर्जीच्या खास दलाची खूण असलेले गोंदण चमकत होते. यातनांनी पिळवटलेल्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पसरले. दिवटी पुन्हा जागेवर अडकवून शिपाई पुन्हा गजांजवळ उकिडवा बसला. मोठ्या कष्टाने नेताजींनी आपली मान गजांवर टेकवली आणि कान शिपायाकडे केला.


                 “सरनोबत..तुमची प्रत्येक खबर महाराजांच्या पायाशी रुजू आहे. तुमचे इथे होत असलेले छळाची कहाणी ऐकून लेकरासाठी माय रडावी तसे महाराज धायधाय रडले. त्यांनी माझ्या हाती अति तातडीचा आणि निर्वाणीचा निरोप पाठवला आहे…”


                नेताजींनी कसाबसा हुंकार भरला.” सरनोबत..पडेल ती किंमत द्यावी पण जीव वाचवा.. इस्लाम स्वीकारून मुसलमान झाल्याचे नाटक करावे..एकदा मुसलमान झालात की, बादशहा मोकळीक देईल… संधी मिळताच राजगडावर निघून या.. आम्ही आहोत. बजाजी नाईकांप्रमाणे शुद्ध करून घेऊ. हा महाराजांचा शब्द आहे… सरनोबत.. उद्या जुम्मा आहे…नमाजानंतर पुन्हा तुम्हाला बादशहासमोर हजर केले जाईल… उद्या तुमच्यासाठी कदाचित शेवटची संधी असेल.. उद्याही तुम्ही इस्लाम स्वीकारायला नकार दिला तर हातपाय तोडणे, डोळे फोडणे, कातडी सोलणे अशा पायऱ्या आता सुरू होतील. मग काहीही करणे शक्य होणार नाही. मुसलमान होतो म्हणालात तर बादशहा जीवे मारणार नाही. म्हणून उद्याच्या संधीचे सोने करून घ्या…”


                     शिवरायांचा निरोप देऊन सिद्दी शिपाई निघून गेला.. नेताजींच्या डोळ्यांसमोर महाराजांची चिरपरिचित हसरी प्रतिमा उभी राहिली. महाराजांच्या नजरेतील मायेचा ओलावा आणि ओठांवर धीर देणारे आश्वासक प्रसन्न स्मितहास्य भासले…


              “महाराज.. मी धन्य झालो. माझ्यासारख्या क्षुद्र सेवकासाठी तुम्ही डोळ्यांतून पाणी काढलेत. माझे सारे जीवन कृतार्थ झाले. तुमची आज्ञा प्रमाण मानून आता सारे तुमच्या, आईसाहेबांच्या आणि जगदंबेच्या स्वाधीन करतो . कीर्ती, अपकीर्ती, यश तुमच्या पायी वाह तो..” त्या सुखाच्या गुंगीत कित्येक महिन्यांनंतर नेताजींना गाढ झोप लागली.


                  सकाळी सिद्दी याकूत कोठडीत आला.  नेताजींच्या जुम्म्याच्या नमाजानंतर जखडलेल्या जेरबंद नेताजींना बादशहासमोर हजर केले गेले. जोखडाचे ओझे पेलत असतानासुद्धा ताठ उभे राहण्याचा प्रयत्न करीत आणि पायबेड्या फरफटवीत नेताजी हजर झाले. मात्र दर खेपेसारखी नजर बादशहाच्या डोळ्यांत रोखलेली नव्हती तर पायदळी झुकलेली होती.


                       “क्यों नेताजी..? आज नजरे झुकाये..?  काय, तू इस्लाम कबूल करण्यास तयार आहेस..? सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, एकमेवाद्वितीय असा अल्लाचा खरा धर्म इस्लाम आहे.. तो तुला कबूल आहे..?
                   अस्फुट स्वरात, जड आवाजात नेताजींच्या मुखातून जड सुस्काऱ्यात शब्द आले,” जी…”
             ” सर्वशक्तिमान अल्लाच्या पनाहमध्ये येण्यास तू स्वखुशीने कबूल आहेस..?”
                 ” जी…”
                 ” मुबारक हो..! अल्लाच्या सच्च्या मार्गावर तुझे स्वागत आहे…”‘जिंदा पीर आलाहजरत आलमगीर’अशा घोषणांनी मोती मशिदीचा सारा परिसर दुमदुमून गेला..


                      शहजाद्याच्या जन्मानंतरसुद्धा आनंदाने फुलला नसेल इतका आलमगिराचा चेहरा आनंदाने फुलला. इस्लामी सत्तेला टक्कर देण्याची हिंमत दाखविणाऱ्या, स्वत:ची स्वतंत्र दौलत उभी करण्याची प्रतिज्ञा करणाऱ्या आणि ती खरी करून दाखविणाऱ्या बंडखोर शिवाजीचा तितकाच त्रासदायक आणि घातकी सिपाहसालार.. सरनोबत.. त्याचा उजवा हात समजला जाणारा नेताजी आज त्याच्यापुढे झुकला होता. त्याची सारी मस्ती, रग, बंडखोरी पार जिरली होती. नेता एकदा मुसलमान झाला की, त्याला आलमगिराशिवाय अन्य त्राता उरणार नव्हता. त्याचा परतीचा मार्ग पुरता बंद होणार होता. या दुसऱ्या शिवाचा उपयोग करूनच  आता शिवाला शह देता येणार होता..


             आलमगीर आनंदित झाला होता, पण आनंदाने हुरळून गेला नव्हता. त्याचे डोके पूर्ण ठिकाणावर आणि पाय पक्के जमिनीवर होते. क्षणभरसुद्धा बेसावध राहून शत्रूला कोणतीही संधी देण्यास तो आता तयार नव्हता.. हात उंचावून त्याने घोषणा थांबविल्या.सिद्दी फुलादखान, इसे बाइज्जत रिहा करो। उत्तमातील उत्तम पेहराव त्याला द्या. लजीज खाना द्या. शाही हकिमाच्या देखरेखीखाली कोऱ्या वस्तऱ्याने याची ताबडतोब केस कापून घे. त्रास झाल्याची वा दिल्याची तक्रार आली तर खैर केली जाणार नाही. ईशाच्या नमाजापूर्वी (सूर्यास्तानंतर ते सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्यास्तानंतर मध्यरात्रीपर्यंत ) माबदौलत स्वत: नव्या बंद्याला कलमा पढवतील. आणि त्याच्या सोबतच ईशाचा नमाज पढतील. मात्र याद रहे, पहारे ढिले होता कामा नये. मागच्या वेळी झाली तशी चूक जर झाली, काही दगा झाला, दगा होण्याची कोशिश जरी झाली, तर गर्दन मारली जाईल. याद राख…”


                   बोलता बोलता बादशहा उभा राहिला. हुजऱ्याने पुढे ठेवलेले चढाव पायात सरकवून कोणाकडेही न पाहता तो झपाट्याने आपल्या खासगी महालाकडे निघाला.


                 बादशहा उठून जाताच नेताजींच्या मानेवरचे जोखड ताबडतोब तेथेच उतरविले गेले. बेड्या तोडल्या गेल्या. इतका वेळ केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर दोन पायांवर उभे असलेले नेताजी धाडकन खाली कोसळले. त्याच क्षणी फुलादखानाचा  दमदार आवाज घुमला ,” इसे उठाकर ले चलो। खबरदार, कोई तकलीफ न हो। आलमपन्हा की हुक्म की तामील हो।” दोन धिप्पाड हबशांनी नेताजींचे शरीर उचलून घुसलखान्याकडे चालविले.


       ✍  लेखन: चंदन पवार 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close