संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग : ८३🚩 नेताजींचा धर्मांतरासाठी छळ..

छताला टांगलेले शरीर खाली उतरविण्याच्या खटाटोपात नेताजींना शुद्ध आली. दिवस उजाडला नसला तरी झुंजूमुंजू झाले असावे. सिद्दी फुलादखान काळभैरवासारखा समोर उभा होताच…


                 एका आडदांड न्हाव्याने जुनाट वस्तऱ्याने नेताजींच्या मस्तकाचा चमनगोटा केला. क्षणही न गमावता त्यांच्या कानात कापसाचे मोठमोठे बोळे कोंबण्यात आले. तसेच बोळे त्यांच्या डोळ्यांवर बसवून पूर्ण चेहरा फडक्याने घट्ट आवळून बांधण्यात आला. जेमतेम श्वास घेता येईल एवढीच सोय ठेवली होती. ढकलत ओढत त्यांना बाहेर काढून पुन्हा वर पटांगणात आणण्यात आले. आगीने भणाणणाऱ्या शरीराला पहाटेचा गार वारा किंचित सुखावून गेला. एका ठिकाणी उभे करून त्यांच्या कंबरेला चऱ्हाट बांधण्यात आले आणि कसलासा चिकट द्रव अंगावर ओतण्यात आला. कंबरेला हिसडा बसला. शरीर हवेत उचलले गेले. थोड्या अंतरावर फिरवून पुन्हा खाली आणले. एका घडवंचीवर बसवून हातपाय मेखा मारून साखळ्यांनी जमिनीला जखडून बांधण्यात आले.


                    कानातले जाड बोळे भेदत फुलादखानाचा भयंकर कर्कश आवाज त्यांच्या कानात शिरला ” आलमगीरांचा हुकूम आहे म्हणून तुझे कान, डोळे आणि तोंड झाकून ठेवले आहे. नाहीतर लाल मुंगळ्यांच्या सोबतीने काकवीची खरी मजा काय असते ते तुला समजले असते. ए शिपाई, उचल ते मडके. त्यात उरलेली काकवी पाहुण्यापासून वारुळापर्यंत थेंब थेंब ओतत जा. भाल्याने वारूळ विसकटून मुंगळ्यांना जागे करा…” 
                     गच्च बांधलेल्या डोळ्यांसमोर अंधारी होतीच. कानांमध्येसुद्धा शांतता पसरली. थोड्या वेळातच अंगावर काहीतरी वळवळू लागले. बहुधा आंब्याच्या झाडांवर बांडगुळांमध्ये असतात तसे मोठाले जालीम लाल मुंगळे होते. काकवीला (ऊसापासून साखर व गूळ तयार करण्याच्या प्रक्रियेत काकवी तयार होते.. काकवीला “पातळ गूळ ” असेही म्हणतात..) उचलताना प्रत्येक मुंगळा कडकडून डसत होता. उघड्या जखमांमध्ये शिरून मांस कुरतडत होता. शरीरावरील प्रत्येक जखम मुंगळ्यांनी भरून गेली. लवकरच सूर्य उगवला. चैत्राचे ऊन तापू लागले; त्यामुळे वेदनेत आणखी भर पडली. घामाचे ओघळ जखमांमध्ये चरचरू लागले. शरीराला मध्येच कंप येई. घामाच्या ओघळाने तसेच कंपनाने मुंगळे अधिकच बिचकत आणि सैरभैर धावत जोमाने चावे घेण्यास सुरुवात करीत. ऊन चढत गेले तसा ताप वाढत गेला. घामाने काकवी ओलसर बनून पाघळू लागली; त्यामुळे मुंगळ्यांना जास्तच चेव चढला.


            कमी होत जाणाऱ्या उष्णतेने दिवस मावळत असल्याचे कळले. शरीरामधील संवेदनाशक्ती कधीचीच नष्ट होऊन गेली होती. अचानक कंबरेला जोरदार हिसडा बसला. शरीर हवेत उचलून तरंगत थोडे दूर गेल्याचे जाणवले आणि धाडकन पाण्याच्या हौदात कोसळले. चार-पाच वेळा चांगले बुचकाळून काढल्यावर अंगावरचे मुंगळे सुटले असावे. नाका-तोंडात पाणी गेले. जीव कासावीस झाला. बधिर झालेल्या शरीराला कुठल्याच संवेदना समजत नव्हत्या. डोक्यावर बादल्याच्या बादल्या गार पाणी ओतले जात होते. शेवटी गळाभर पाण्यात बसवून ठेवले गेले. तशा अवस्थेतच शुद्ध हरपली. त्याच अवस्थेत रात्र गेली.


                पुन्हा दोराला हिसडा बसला आणि शरीर हौदातून बाहेर आले. पाण्यात रात्र काढूनसुद्धा काही चुकार मुंगळे तोंडाला बांधलेल्या फडक्यामध्ये वळवळत होतेच. फडके सोडविणाऱ्या शिपायांना त्याचा प्रसाद मिळाला. शिव्या देऊन, लाथा-बुक्क्यांनी तुडवून त्या शिपायांनी आपल्या रागाला वाट करून दिली.


               डोळे उघडताच कंबरेवर हात ठेवून सैतानासारखा हसत उभा असलेला फुलादखान दिसला. लागलीच नेताजींना एका खांबाशी बांधण्यात आले. खांबाच्या सभोवती दोन कदमांच्या अंतरावर एक चर खणलेला होता. लाकूड आणि गोवऱ्यांनी चर भरलेला होता. तो चर पेटविण्यात आला. “संध्याकाळपर्यंत जाळ विझता कामा नये. जर विझला तर तुमची खैर नाही, लक्षात ठेवा.” पहारेकऱ्यांना असा दम देऊन फुलादखान निघून गेला. फटक्यांच्या आणि अणकुचीदार आकड्यांच्या जखमा, मुंगळ्यांच्या चाव्यांमुळे त्यातच उठलेल्या मोठमोठ्या गांधींमुळे नेताजींच्या शरीराची आधीच चाळण झालेली होती.


                 वेदना आणि आगीच्या भगभगीने शरीर आधीच प्राणहीन झालेले होते त्यात हा जाळाचा ताप… थोड्याच वेळात आकाशातून सूर्य आग ओकू लागला. शरीर आतून-बाहेरून पेटून निघाले. कणाकणांत घण घातल्याप्रमाणे वेदना उठल्या. जोरजोरात विव्हळावे, किंचाळावे असे नेताजींना वाटू लागले..पण त्या भावनेवर ताबा ठेवण्यात कसेबसे यश आले. आतापर्यंत बेहोशीबरोबर चांगली मैत्री जमून गेली होती. शेवटी तीच मदतीला धावून आली.


                सायंकाळी फुलादखान आला तेव्हा नेताजींना कसेतरी शुद्धीवर आणले गेले. फुलादखान उपहासात्मकतेने म्हणाला,” समजले का दर्द म्हणजे काय ते ? तो रसूल बेग आपला मूर्खासारखा नुसता विनवण्या करीत होता. आता काय निर्णय करायचा तूच ठरव. तू ठरवीपर्यंत हा सिलसिला असाच सुरू राहणार आहे. आता गाझी बेगचे ऐकायचे की माझा हा पाहुणचार घ्यायचा हे ठरवायला तुला तीन दिवसांचा वेळ आहे. जुम्म्याच्या नमाजानंतर हजरत अलीजांसमोर तुझी पेशी आहे. तोपर्यंत शाही बिछान्यावर आराम कर.”


                 उघड्यानागड्या नेताजींना पुन्हा तळघरातील कोठडीत नेले गेले. मिरच्यांच्या धुनीची राख कोठडीभर विखरून पसरली होती. कोठडीत एक तक्ता पडला होता. त्याला अणकुचीदार खिळे ठोकले होते. त्यावर आडवे झोपवून नेताजींना जमिनीवर जखडून टाकले गेले.
                      इकडे राजगडावर शिवरायांना बातमी मिळाली की नेताजींचा मोगली कैदेत अत्यंत जीवघेणा छळ केला जातोय… इस्लाम धर्म स्विकारण्याची सक्ती केली जातेय.. शिवराय नेताजीं च्या काळजीने व्यथित झाले.. राजांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले… काहीही करून नेताजींना वाचवले पाहिजे… त्यांनी बहिर्जिना बोलावून नेताजींपर्यंत निरोप पोहचवा की तुम्ही जीव वाचविण्यासाठी इस्लाम स्वीकारा… नंतर बजाजींसारखे तुमचे शुध्दीकरण करता येईल.. पण आता तुमचा होणारा छळ थांबवा… इस्लाम स्वीकारून बादशहाची मर्जी संपादन करा.. अचूक वेळ मिळाल्यावर मोगलांना हुल देऊन राजगड गाठा…


               नेताजींचा छळ दिवसेंदिवस चालूच होता..बुधवार-गुरुवार-शुक्रवार जेवण आणि विश्रांती.. तीसुद्धा मिरच्यांची राख मिसळलेल्या राखेत…. कारण दर जुम्म्याच्या नमाजानंतर बादशहासमोर आपल्या पायांनी चालत नेताजी हजर व्हायचे.. दर वेळेला थोडी गोडीगुलाबी.. धमकी.. दहशत.. आणि धर्मांतराचा आग्रह होत राहिला. दरवेळी झाडाच्या खोड्याला जखडलेले.. साखळदंड आणि दोरखंडांनी जेरबंद केलेले.. विकलांग असले तरी केवळ प्रखर इच्छाशक्तीने ताठ उभे असलेले नेताजी मुखावाटे शब्दही न काढता एकटक बादशहाच्या नजरेला नजर भिडवून असत… त्या नजरेच्या धगीने बादशहाच अस्वस्थ होऊन जायचा…


            ✍ लेखन: चंदन पवार

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close