संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग: ७८🚩 बादशहाच्या हातावर “तुरी ” दिल्या

१५ ऑगस्ट १६६६ रोजी शंभूराजे नेहमीप्रमाणे बाहेर पडले अन तेथेच मुक्कामी राहिले. १६ ऑगस्टलाही ते रात्री परतले नाहीत. कोणाकडे तरी मुक्कामी पाहुणचार घेत असतील म्हणून कोणासही नवल वाटले नाही , आणि कोणी विचारपूसही केली नाही. १७ ऑगस्टला काही बाहेरचे व्यापारी आग्रा शहरी येऊन शिवरायांची विचारपूस करण्यासाठी कोठडीत येणार आहेत अशी माहिती सुरक्षा व्यवस्थेला दिली गेली. त्यानुसार दुसऱ्या दिवशी व्यापारी शिवरायांच्या कोठडीवर आले . बैठक – चर्चा होऊन नजराणे , भेटींची देवाणघेवाण झाली. मिठाईचे वाटप झाले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही मिठाईचे वाटप करून त्यांच्या हुद्द्यानुसार भेटी देण्यात आल्या. आलेले सर्व व्यापारी दुपारी निघून गेले. थोड्या वेळाने मदारी मेहतर व हिरोजी फर्जंद यांनी सुरक्षारक्षकांना सांगितले की, ” शिवरायांना मिठाई खाल्ल्यामुळे पोट बिघडले व उलट्या होत आहेत. अशक्तपणा वाढला आहे. थंडी वाजत आहे. त्यामुळे काढा घेऊ ते विश्रांती घेत आहेत. रात्रभर झोप झाल्यावर उद्यापर्यंत शिवरायांना बरे वाटेल. त्यामुळे उद्या दुपारपर्यंत तरी कोणालाही आत पाठवू नका.” सुरक्षारक्षकांनाही बरे वाटले. आपली दगदग कमी झाल्याच्या आनंदाने त्यांनी कोठीच्या आवराचे फाटक बंद करून घेतले.


                       १८ ऑगस्टला मदारी मेहतर कोठडीच्या आत दवापाणी घेऊन फिरतांना , झोपलेल्या अवस्थेतील शिवरायांचे अंग चेपतांना , दार किलकिले करून राजांना आता बरे वाटते असे सुरक्षा रक्षकांना सांगताना दिसत होता. काही वेळानंतर मदारी मेहतर व हिरोजी फर्जंद कोठीतून बाहेर आले अन कोठीचे दार पुन्हा लावून घेतले.  ” राजे शांत झोपले आहेत.इतर सेवक कामात आहेत. राजांना त्रास होईल अशा हालचाली, गडबड- गोंधळ करू नका. त्यांच्या खोलीचा दरवाजा बंदच ठेवा. आम्ही तातडीने बाजारातून औषधी व काही वस्तू घेऊन येतो “, असे सुरक्षा रक्षकांना दुपारी सांगून गेलेले हिरोजी व मदारी संध्याकाळ झाली तरी परतले नाहीत .


                      संध्याकाळचा पहारा बदलण्यासाठी व हजेरी घेण्याकरता कोतवाल फुलादखान आला. कोठीत स्मशानशांतता होती. राजांना बरे नाही व त्यांचे सेवक दवापाणी आणण्यासाठी बाजारात गेले आहेत अजून आलेले नाहीत. अशी माहिती फुलादखानास सुरक्षा रक्षकांकडून मिळाली. आपण शिवाजीराजांची विचारपूस करावी या हेतूने कोठीचे दार ढकलून उघडले.  समोर पलंगावर राजे पायापासून डोक्यापर्यंत चादरीने अंग झाकून झोपलेले फुलादखानास दिसले. नंतर फुलादखानाने शिवरायांच्या सेवकास आवाज दिला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बाहेरच्या सुरक्षा राक्षकास बोलावून फुलादखानाने शिवरायांना उठवायला सांगितले. हाका मारूनही राजे उठले नाहीत. कोतवाल फुलादखान आता मात्र दार उघडून स्वतः आत आला. पलंगाशेजारी उभा राहून ” राजे -राजे ” म्हणत शिवरायांना जागे करू लागला ; पण काहीच हालचाल झाली नाही. ” राजांचा मृत्यू झाला की काय ?” या विचाराने फुलादखानाला घाम सुटला. त्याने चादर न काढता शिवरायांच्या शरीराला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला ; अन हाताला मऊ लुसलुशीत असे काहीतरी त्याच्या हाताला जाणवले. एका क्षणात कोतवालाने चादर बाजूला फेकली. चादरीखाली कोणीही माणूस नव्हता तर एकमेकांवर रचून ठेवलेल्या लोड- उशा  होत्या. तत्क्षणी कोतवाल व सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यासमोर काजवे चमकू लागले.


                 फुलादखानाने बादशहाला खबर पोहचवली की , “राजा कोठडीत होता , वरचेवर जाऊन पाहता एकदम गायब झाला. पळाला, जमिनीत गेला की आकाशात गेला हे काही कळत नाही. आम्ही जवळ असतांनाही तो नाहीसा झाला.” फुलादखानाच्या या शब्दांनी औरंगजेबाच्या क्रोधाला सीमा राहिली नाही.


                       “शिवाजी राजे पळाले, निसटले ” ही बातमी सर्वत्र पसरून शोधाशोध सुरू झाली. बादशहा औरंगजेबाची दातखिळी बसल्यासारखी अवस्था झाली होती. सर्वत्र नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. शंभुराजेंना पकडण्यासाठी सैनिक रामसिंगकडे आले. पण दोन दिवसांपासून शंभूराजे रामसिंगच्या घराकडे फिरकलेच नाहीत अशी माहिती मिळाली.


                   १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराज आग्र्यातून बादशहाच्या हातावर तुरी देऊन निसटले या गोष्टीला आज ३५० वर्ष पूर्ण झालीत. वाचकमित्रहो , जरा विचार करा हजारो मैल दूर शिवाजीराजे बादशहाच्या भेटीला जातात. सोबत ६०० मराठे घेऊन जातात. त्यापैकी ५०० आधीच माघारी पाठवून देतात. १०० मराठयांच्या सहकार्याने शिवराय हा सारा डाव औरंगजेबासोबत खेळतात. कपटी, धूर्त औरंगजेबाच्या मुलखात डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असताना , फुलादखानाच्या फौलादी मिठीत राहतांना संयम हरवू न देता मोठ्या मनोधैर्याने १०० दिवस व्यतित करतात. शिवाजी महाराज बादशहाच्या तावडीतून मिठाईच्या पेटाऱ्यातुन पसार झाले वा वेशांतर करून निसटले याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. अनेकांना हे गूढ , कोडं उकललेलं नाही. औरंगजेब बादशहाच्या एवढ्या कडेकोट बंदोबस्तातुन शिवाजी महाराज फक्त त्यांच्या उत्तम नियोजनामुळे निसटले हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

खरं तर आपण काय काम करतो याला महत्व नाही, काम कसं करतो यालाही महत्व नाही फक्त आपण त्या कामाचं नियोजन कसं करतो याला सर्वात जास्त महत्व आहे. म्हणून जीवनात प्रत्येक कामाचे, गोष्टीचे नियोजन करा. यश आपल्या पदरी पडेल यांत तिळमात्र शंका नाही.


          ✍लेखन: चंदन पवार

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close