संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग: ७७🚩 नजरकैदी शिवरायांच्या “गनिमी” युक्त्या

औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेल्या शिवरायांनी औरंगजेबाला मीर बक्षी मोहम्मद अमीनखान द्वारे पत्र लिहून कळवले की ,” जर बादशहा मला माझे सारे गड परत द्यावयास तयार असतील तर मी त्याबदल्यात बादशहाला दोन कोटी रुपये देईन. मला दक्षिणेत जाण्याची आज्ञा द्यावी. माझ्या मुलाला शंभूराजांना मी येथेच ठेवून जाईल.”  या पत्राचा औरंगजेबावर अनुकूल परिणाम होण्याऐवजी प्रतिकूल परिणाम झाला. त्याला असे वाटले की, आपल्या अधिकाऱ्यांना लाच देऊन व आपल्या नम्रतेच्या भाषेने झुलवत ठेवून हा मराठा आपल्या हातांवर तुरी देऊन निसटून जाईल यासाठी त्याने कडक उपाययोजना करावयाचे ठरवले. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडण्यास मनाई केली. नगराध्यक्ष फुलादखानास पाच हजाराचे सैन्याचे कडे शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाभोवती सुसज्ज करण्यास सांगितले.


               शिवाजी महाराजांचा नजरकैदेने जर खरोखर दयनीय परिस्थिती कोणाची झाली असेल तर ती मिर्झाराजे जयसिंग व रामसिंग यांची झाली होती. ते वचनबद्ध झालेले राजपूत होते. पण आपल्या पाताळयंत्री व विश्वासघातकी धन्याचे तेही नियंत्रण करू शकत नव्हते. फुलादखानाच्या पहाऱ्यात महाराजांची केव्हाही हत्या होऊ शकते हे रामसिंगाने ओळखले व त्याने शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाच्या आतील भागात इतकेच नव्हे तर महाराजांच्या पलंगाभोवती आपल्या विश्वासातील राजपूत योद्ध्यांचा पहारा ठेवला. फुलादखानाच्या कारस्थानात हा मोठाच अडथळा होता.


                      फुलादखानाने रामसिंग यांना याबाबत विचारणा केल्यावर रामसिंगाने त्याला स्पष्ट सांगितले की, माझ्याकडून बादशहाने शिवाजीराजासंबंधी लेखी पत्र लिहून घेतले आहे. उद्या शिवाजीराजांनी आत्महत्या केली किंवा अन्य मार्गांनी ते नाहीसे झाले तर मला उत्तरदायी समजण्यात येईल. मला माझे काम केलेच पाहिजे. इतक्या चपखलपणे दिलेल्या रामसिंगच्या उत्तरावर फुलादखान काहीच करू शकत नव्हता.
                    दिवसामागून दिवस जात होते. शंभूराजे आता बादशहाच्या दरबारात येऊ-जाऊ लागले होते. शिवाजी महाराजांनी दिलेल्या बारीकसारीक सूचनांचे मात्र ते तंतोतंत पालन करत होते. शंभराजेंची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून दरबारातील सरदार भारावून जात. औरंगजेब थक्क होत असे. हळूहळू शंभूराजे औरंगजेबाचे आवडते झाले आणि त्याच्या कुटुंबात शिरले. त्या बादशाही कुटुंबातही शंभूराजे सर्वांचे लाडके झाले. 
                      औरंगजेबाच्या या नजरकैदेतुन आपली सहजासहजी सुटका होणार नाही म्हणून सह्याद्रीच्या या शूर सिंहाने दिल्लीच्या नरभक्षक वाघाला आपल्या प्रतिभेचा चमत्कार  दाखवण्याचे ठरवले. औरंगजेबाच्या  दरबारी येतांना महाराजांनी आपले मावळ्यांचे सैन्य व निवडक मुत्सद्दी आणले होते. इतक्या लोकांना जवळ ठेवणे पुढील योजनेच्या दृष्टीने सोयीचे नव्हते. म्हणून आपल्याजवळील माणसांना प्रथम दक्षीणेत पाठवण्याचे महाराजांनी ठरवले. 


                     दिनांक ७ जून १६६६ या दिवशी  औरंगजेबाकडे शिवरायांचे हे आवेदन पत्र गेले. त्यात “मी सोबत आणलेली रोकड संपली असून बादशहाने कर्जरूपाने पैसे द्यावेत. शिवाय मला सोडत नसल्यास माझ्या सहकारी व सैनिकांना परत दख्खनमध्ये जाण्याची परवानगी देऊन प्रवास परवाने द्यावेत ” अशा आशयाचे पत्र शिवरायांनी औरंगजेबाला लिहले. शिवरायांचे पत्र वाचून औरंगजेब खुष झाला. कारण शिवरायांचे सहकारी जर दख्खनला परतले तर शिवरायांचे इथले बळ कमी होईल म्हणून त्याने शिवरायांना सोबत आणलेल्या सहकारी व सैनिकांना तब्बल ४८ दिवसांनी म्हणजे २५जुलै १६६६ रोजी दक्षिणेत परत जाण्याची आनंदाने परवानगी दिली.


                 शिवरायांनी आपल्या जन्मजात राजनीतीच्या तत्वाचा अवलंब करून रामसिंगाकरवी मिर्झाराजेंना पत्र लिहून चौसष्ट हजाराचे कर्ज रोकड रुपात मिळवले. शिवरायांजवळ सर्व रोकड पोहचल्यावर त्यांनी त्यांच्या मुक्कामाच्या कोठीवरील सुरक्षा यंत्रनेच्या प्रमुखासह सर्व शिपायांना रोकड रकमेच्या भेटी दिल्या, नजराने दिले. लहान लहान टोळ्या करून, बादशहाची शाही शिक्के जवळ असलेली पत्रे घेऊन ही मंडळी दक्षिणेत निघून गेली. या मंडळीत कवींद्र परमानंद हेही होते. आपले सहकारी परत गेल्यावर अगदी थोड्या मंडळींनिशी शिवाजी महाराज नजरकैदेत होते..


              औरंगजेबाचा सरदार फिदाईखानाची हवेली पूर्ण झाल्यावर तेथे शिवरायांना हलविण्यात येणार होते. पाश्चात्त्य लेखक कॉस्मा गार्डने असे लिहून ठेवले आहे की ,”औरंगजेबाने शिवरायांचे मस्तक तोडून ते शाही भेट म्हणून ठेवण्यासाठी चांदीचे तबक बनवले होते.” शिवरायांनी आग्रा शहरातील प्रतिष्ठित लोक, सरदार, व्यापारी , सावकार यांची ओळख होऊन मदत होण्याच्या हेतूने दूतांमार्फत नजराणे पाठवण्यास सुरुवात केली.


                     शिवाजीराजे व शंभूराजे यांचे वर्तन संशयास्पद नव्हते. काही दिवसांत शिवाजीराजांची मानसिकता बदलेल व ते बादशाही सेवेचा स्वीकार करतील आणि मग त्यांना वायव्य सरहद्द प्रांतात पाठवू. जर बादशाही सेवेचा स्वीकार नाही केला तर शिवाजीराजांना ठार मारू असे बेत औरंगजेब आखत होता . आपल्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसून बादशहावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे औरंगजेबास कळवले होते. सगळीकडे असे वातावरण तयार झाल्याने शिवरायांवरचा विश्वास वाढू लागला. रामसिंगही आपल्या वडिलांचा शब्द सार्थ ठरवत होता. 

           ✍लेखन: चंदन पवार

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close