पुण्यात आता दिवसभर प्रवास करा तो सुद्धा फक्त 10 रुपयांत…

पुणे – मध्य भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, तसेच कमी अंतरावर प्रवासासाठी पर्याय मिळावा, यासाठी पीएमपी प्रशासन सर्व पेठा, गावठाण परिसरांत दिवसभर 10 रुपयांत प्रवास करण्याची योजना राबवणार आहे. पीएमपीएल प्रवाशांची संख्या वाढवण्याबरोबरच त्यांना जलद सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजेनेमागे आहे. यातून पीएमपीएल च्या उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. यासाठी लवकरच काही मिडी बस खरेदी करणार असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पीएमपीएलच्या या योजनेमुळे सक्षम होणार असल्याचा विश्वास यानिमित्ताने व्यक्त होत आहे. या योजनेतून प्रवास चांगला व्हावा आणि तो स्वस्त व्हावा याकडे भर देण्यात आला आहे. या बससेवेमुळे निश्चितच पुणेकरांना प्रवास करणे सुलभ होणार आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत दि.26 जानेवारीपासून ही सेवा सुरू करण्याच्या प्रयत्न असून, यासाठी महापालिकेच्या वतीने 50 ते 60 मिडीबस खरेदी करण्यात येणार असल्याचे रासने यांनी सांगितले. नागरिकांना कमी अंतरावर जाण्यासाठी अनेकदा लांब पल्ल्याच्या बसमध्ये चढावे लागते. अनेकदा या बसेस तुडुंब भरलेल्या असतात. तर काही वेळा जवळच्या अंतरावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्यास, दूरवर जाणाऱ्या प्रवाशांना त्या बसमध्ये जागा मिळत नाही.
यामुळे पीएमपी प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर दिवसभर 10 रुपयांत प्रवास करण्याची योजना आणली असून, यासाठी लवकरच झोन तयार करण्यात येणार आहेत.
आता या योजनेनंतर तरी पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे वळतात का याची उत्सुकता आहे.