पुणे

अयोध्येचे श्रीराम मंदिर जगाची सांस्कृतिक राजधानी बनेल – श्री. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, कोषाध्यक्ष, रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास


          श्रीरामजन्मभूमी  तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने उभारणी होत  असलेल्या राम मंदिराचे कार्य आता गतिमान झाले आहे.  सुमारे पाच शतके चाललेला रामभक्तांचा संघर्ष यशस्वी होऊन दि. 9 नोव्हेंबर 2019 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सत्याचा पूर्णपणे स्वीकार करून   मंदिराचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार भारताच्या केंद्र शासनाने श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाची स्थापना केली.  न्यासाच्या विनंतीवरून मा. पंतप्रधानांनी 5 ऑगस्ट 2020 रोजी श्री रामजन्मभूमीच्या जागी भूमिपूजन व शिलापूजन करून कार्याचा श्री गणेशा केला. 

संपूर्ण देश आणि  जगातील सर्व रामभक्तांचे नेत्र त्या दिव्य दृश्याकडे लागले होते. कोट्यवधी नेत्र सजल बनले होते.  या श्रीरामकार्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या असंख्य दिवंगत हुतात्म्यांचे स्वाभाविक तर्पण होत होते.  त्यांना परमशांतीचा अनुभव मिळत होता. प्रस्तावित निर्माणाधीन मंदिर तीन मजल्यांचे असेल.  प्रत्येक मजल्याची उंची 20 फूटांची असेल.  मंदिराची एकूण उंची 161 फूट असेल, लांबी 360 फूट आणि रूंदी 235 फूट असेल.  त्यावर पाच शिखर असतील.  तीन मजल्यांमध्ये मिळून एकूण 160 स्तंभ लागतील.  हे मंदिर  2.7 एकर जागेवर होईल.  त्याचे संपूर्ण बांधकाम केवळ दगडांनी असेल.  सिमेंट व लोखंडाचा वापर यात होणार नाही .

मंदिर परकोटाच्या बाहेर सुमारे 108 एकर जागेवर यज्ञशाळा, सत्संग भवन, संग्रहालय, संशोधन केंद्र, प्रदर्शन, अतिथी भवन इत्यादी सर्व अत्याधुनिक सोई-सुविधा होतील.  मंदिर बांधकामाचे वास्तुकार मे.  चंद्रकांत सोमपुरा, बांधकामकर्ता मे.  लार्सन अँड टूब्रो तसेच व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे.  टाटा कंसल्टिंग इंजिनियर्स यांना निश्चित करण्यात आले आहे.  एकूण तीन ते साडे तीन वर्षांच्या अवधीत हे कार्य पूर्ण होईल.   

पायाभरणीसाठीसुद्धा तज्ञ समितीच्या मार्गदर्शनानुसार दगडांचाच वापर होईल. मंदिराच्या बांधकामाच्या अनुषंगानेच श्रीअयोध्येचे  विकास कार्यसुद्धा सुरू झाले आहे.  बांधकामानंतर आधी संपूर्ण भारत देश, नंतर जवळपासचे आशियाई देश व त्यानंतर संपूर्ण जगातील रामभक्तांचा संपर्क, समन्वय, सहयोग आणि समरसतेच्या केंद्राच्या रूपात ती पुढे येऊन जगाच्या सांस्कृतिक राजधानीचे स्वरूप तिला येईल, असा आमचा प्रयत्न असेल. या महान कार्यासाठी अर्थसंकलन करण्यासाठी मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत म्हणजे दि. 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी 2021 पर्यंत “निधी समर्पण अभियाना’चा आरंभ होत आहे.  या माध्यमातून देशातील चार लाख गाव तसेच 11 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन केले आहे.  पावती पुस्तके आहेतच.  तसेच 1000/-, 100/- आणि 10/- रुपयांच्या कूपन्सच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. अशी माहिती  श्री रामजन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत पुणे येथे दिली.


            प्रत्येक जाती, संप्रदाय, मत, पंथ, क्षेत्र, भाषा, प्रदेशातील भाविकांशी संपर्क होईल.  अरुणाचल, (नागभूमि( नागालँड अंदमान –निकोबार सोबतच कच्छ रण, पर्वतीय क्षेत्र आणि वनांचलातील सुदूर व्यक्तींशीसुद्धा संपर्क होईल. काश्मीर ते कन्याकुमारी तसेच सोमनाथ ते मेघालयापर्यंत सर्व प्रकारच्या श्रद्धांच्या सेतुबंधनांनी राममंदिर उभे राहील. हे केवल मंदिराचे बांधकाम नाही, अजेय राष्ट्रमंदिराच्या उभारणीचे कार्य आहे. लाखो हुतात्म्यांनी या धर्मकार्यात बलिदान दिले आहे. त्यांच्या महान त्यागाचे श्रद्धापूर्वक स्मरण करून आपण आपल्या अधिकाधिक अर्थदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे. प्रदीर्घ काळ कपड्याच्या तंबूत घालविणाऱ्या श्रीरामलल्लांच्या भव्य मंदिराच्या निर्माणासाठी  कमाल आर्थिक योगदान आज सर्वाधिक पुण्याचे कार्य आहे. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई क्षेत्र मंत्री  शंकरजी गायकर यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या अभियानाची माहिती दिली.          

  
             संपूर्ण  महाराष्ट्रात 45 हजार गावातील 2.5 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात 5000 संतआणि 2.5 लाख रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ अभियानाचे लक्ष्य  गाठण्यासाठी कार्यरत राहणार आहेत. संपूर्ण महराष्ट्रातील सर्व गावे आणि  कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य  ठेवण्यात आले आहे. पंथ, प्रांत, भाषा, पक्ष, याप्रकारचे सर्व भेद विसरून सर्व रामभक्त एकदिलाने रामकार्यात सक्रीय झाले आहेत. सर्वत्र उत्साहाचे आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.


          महाराष्ट्रात पुणे, नाशिक, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा  या 7 शासकीय जिल्ह्यात एकूण 10 हजार गावातील 50 लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात 2000 संत आणि 50 हजार रामभक्त कार्यकर्ते पूर्णवेळ अभियानात सक्रीय सहभाग देणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील आदिवासी भागात सुद्धा हे अभियान सर्व गावात होणार आहे. तसेच पुणे शहरात 8 लाख कुटुंबांपर्यंत पोहचण्याकरिता 8 हजार कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात दिनांक 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत हे अभियान होणार आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रांत अभियान प्रचार प्रमुख विवेक सोनक यांनी आभार मानले.


            या अभियानच्या कार्याकरिता केंद्रीय अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह  भैय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत  दिनांक 27 व 28 डिसेंबर या कालावधीत मोठा निधी देणाऱ्या रामभक्तांच्या भेटी घेण्यात आल्या. दिनांक 11 ते 14 जानेवारी 2021 या कालावधीत विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री  मिलिंदजी परांडे यांचा पश्चिम महाराष्ट्र प्रांतात प्रवास निश्चित झाला आहे. श्रीरामजन्मभूमी मंदिर निर्माण अभियानाकारीता प्रांताची सर्व योजना निश्चित झाली आहे. प्रांत स्तरापासून ते विभाग,जिल्हा, तालुका, गाव पातळीपर्यंत नियोजन करून प्रत्येक घराघरात न्यासाच्या वतीने निधी संकलन करण्यासाठी स्वयंसेवक जाणार आहेत.

      पत्रकार परिषदेला विश्व हिंदू परिषदेचे, मुंबई क्षेत्र मंत्री शंकरजी गायकर, रा.स्व. संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीणजी दबडघाव, प्रांत अभियान प्रमुख संजय मुदराळे, प्रांत अभियान सहप्रमुख मिलींद देशपांडे, पूणे महानगर अभियान सहप्रमुख महेश पोहनेरकर  उपस्थित  होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close