संस्कृती

🚩शिवछत्रपती भाग:७०🚩 पुरंदरच्या तहानंतर…..

मोगल फौजेने स्वराज्याचा पार विचका करून टाकला होता. शेती उजाड होऊन गावे ओसाड झाली होती. दावणीची गुरे मोगली सुऱ्याखाली मरत होती. शेकडो स्रिया भ्रष्ट झाल्या होत्या. तरणीताठी पोरं गुलाम करून नेली जात होती. दिलेरखानाची गडकोटाची मोहीम पुढे सरकत नव्हती. पण शिवरायांना गडकोटांची चिंता नव्हती… तर रयतेची चिंता त्यांना अस्वस्थ करत होती. रयत वाचवायची असेल तर मान- प्रतिष्ठा बाजूला ठेवणे गरजेचे होते. अंतिम ध्येयावर नजर ठेवून प्रसंगी दोन पावले मागे हटणे हाच खरा ” गनिमी कावा “…त्यात व्यक्तिगत प्रतिष्ठा व स्वाभिमान नाला थारा नसतो. म्हणून शिवरायांनी आलेला बिकट प्रसंग ओळखून रयत व स्वराज्याचा सर्वनाश टाळण्यासाठी नमते घ्यायचे ठरवले. पुढचे बरेच महिने तलवार म्यानात ठेवून जळत काढावे लागणार होते.       

                          स्वाभिमानाचा जळता अंगार असलेल्या शिवाजीराजांना हा पुरंदरचा तह व त्यातील जाचक अटी मान्य केल्यावर स्वतःचीच शरम वाटत होती. वीस वीस वर्षे अथक परिश्रम करून…, जीवघेण्या लढाया करून…प्रत्यक्ष काळाचा थरकाप व्हावा अशी साहसे पत्करून…सवंगड्यांचे प्राण वैरून उभे केलेले हे स्वराज्य… मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग येतो आणि एका फटकाऱ्यात उध्वस्त करून टाकतो… केवळ आमच्या एका शब्दाखातर.. नजरेच्या एका इशारतीवर…ज्यांनी आपले प्राण हसत हसत ओवाळून टाकले ते मावळे मला विचारताहेत.. सांगा महाराज सांगा..काय याच मानखंडनेसाठी आम्ही आमच्या संसारवर पाणी सोडले.. त्यांना मी काय उत्तर देऊ..? असा राजे सारखा विचार करत होते.


        दुसऱ्या दिवशी तहाचा मसुदा तयार झाला आणि मंजुरीसाठी औरंगजेब बादशहाकडे पाठवण्यात आला. राजांनी आपली माणसं पाठवून रोहिडा, लोहगड, टोक व तिकोना हे किल्ले मोगलांच्या ताब्यात देण्यासाठी गडकऱ्यांना सूचना देण्यात आल्या. पुरंदरच्या ह्या तहाने शिवरायांनी न लढता अनेक किल्ले व मुलूख गमावला पण स्वराज्य वाचवले… रयतेची बरबादी वाचवली.. शिवरायांचा उमदा स्वभाव, अदब- विनम्र लाघवी बोलणे- वागणे, धर्मावरची निष्ठा, स्वराज्याची तळमळ पाहून मिर्झाराजे खुश झाले. ते शिवरायांवर पुत्रवत प्रेम करू लागले. राजे राजगडावर जायला निघाले तेव्हा मिर्झाराजांनी शिवाजीराजांना दागिन्यांनी मढवलेले दोन घोडे व एक हत्ती भेट म्हणून दिला.


                    राजे पालखीत बसले. राजांच्या अश्वदळाबरोबर कछवाह व किरतसिंग आपल्या मोगली घोडदळासह पुढे जात होते. राजांची पालखी कोंढाण्याकडे भराभर पुढे जात होती. मांसाहेब जिजाऊ व राणीपरिवार कोंढाण्यावर होता. त्यांना पुरंदरच्या तहात गमावलेला कोंढाणा खाली करून राजगडावर न्यायचे होते. कोंढाणा नजीक आला होता. पालखीतून राजांना कोंढाण्याचे दर्शन होत होते. कोंढाणा म्हणजे कोकणचा दरवाजा..! मोक्याची जागा असलेला बुलंद किल्ला…!  याच कोंढाण्याने आबासाहेबांची सुटका केली होती. याच कोंढाण्याने जसवंतसिंगाला मराठी सामर्थ्याची दहशत बसवली होती.


                शिवाजीराजे कोंढाण्यावर आले. मांसाहेबांना पुरंदरच्या तहाची माहिती दिली. तातडीने जिजाऊ व राणीपरिवाराला घेऊन कोंढाणा किरतसिंगच्या हवाली केला आणि राजगडावर परतले.


                      तहात ठरल्याप्रमाणे  नऊ वर्षाचे शंभुराजे मिर्झाराजांकडे जायला निघाले. मस्तकी जिरेटोप, अंगात अंगरखा विजार घातलेली, कमरेला तलवार पाठीला ढाल आणि शेल्यात कट्यार खोवलेले देखणे शंभूराजें शिवरायांसमोर उभे होते. त्यांना निरोप देतांना शिवराय, जिजाऊ आऊसाहेब व राण्यांचे काळीज तीळ तीळ तुटत होते. शंभूराजासोबत नेताजी पालकरही जाणार होते. उग्रसेन कछवाह, संभाजीराजे व नेताजी पालकर सर्वांना निरोप देऊन मिर्झाराजेंकडे निघाले.


            अवघे १२ किल्ले आणि एक लाखांचा मुलुख आता तहानुसार शिवरायांकडे राहिला होता. पावसाळा संपल्यावर दिल्लीहून बादशहाचे फर्मान आले. आलमगिराने पुरंदरचा तह मान्य करून संभाजीराजांना सहा हजाराची मनसब, दोन लक्ष रुपये आणि निशाणी नौबत घेण्याची परवानगी बादशहाकडून मिळाली होती. संभाजीराजे  बादशहाचे सहाहजारी मनसबदार झाले होते.


                          आपल्या चतुर, नम्र स्वभाव व देखण्या व्यक्तिमत्त्वाने संभाजीराजे मिर्झाराजे जयसिंग यांना आपलेसे केले. नऊ वर्षाच्या शिवपुत्र संभाजीने आपल्या गोड बोलणी बोलण्या- बोलण्यात त्यांच्याकडून औरंगजेब बादशहा व तेथील एकूण कारभाराबाबत सखोल माहिती मिळवत.. मिर्झाराजे व दिलेरखान शंभूराजेंना मोगल दरबाराचे रीतिरिवाज शिकवून समजावून सांगत असत. नऊ वर्षाच्या शंभुराजेंचे अफाट ज्ञान पाहून दिलेरखान थक्क झाला होता. या वयात शंभराजेंचा करारीपणा , निर्भीड वागणे, प्रचंड आत्मविश्वास , युद्धनीती, अनेक भाषेवरील प्रभुत्व या कारणांनी शंभूराजे दिलेरखान व मिर्झाराजेंच्या कौतुकास पात्र झाले होते. कौतुकाने दोघेही शंभूराजेंना औरंगजेबाकडील अनेक गुपिते सांगून बादशहाचा मोठेपणा वाढवण्याचा प्रयत्न करत. वर्षभरात शंभुराजेंना आग्रा दरबारातील प्रमुख लोकांची माहिती , औरंगजेबाच्या कुटुंबाची माहिती , शहरातील माहिती प्रत्यक्ष पाहिल्यासारखी माहीत झाली.   


                        असेच एके दिवशी शिवरायांना जासुस पाठवून मिर्झाराजेंनी आपल्या छावणीत बोलावून घेतले. सायंकाळी शिवाजीराजे- मिर्झाराजे बोलत बसलेले असतांना आदिलशाही मुलुख काबीज करण्याचा आमचा बेत आहे अशी आलमगीर बादशहाचीही तशीच इच्छा आहे. मिर्झाराजेंचा हा मनसुबा ऐकून शिवाजीराजे थक्क झाले. आदिलशाही व कुतुबशाही दोनी मुस्लिम शाह्या…तरी त्याविरुद्ध मोगल उठतील असे राजांना वाटले नव्हते. उत्तरेत परतण्याआधी आदिलशाहीच्या बादशहाचे राज्य मोगलशाहीला मिळाले तर आलमगीर बादशहा प्रसन्न होईल या हेतूने मिर्झाराजेंनी आदिलशाहीवर स्वारी करण्याची तयारी केली.


                 आदिलशाहीवरील मोहिमेत संभाजीराजांना मनसबदारीतून मिळालेली बारा हजारांची फौज शिवाजीराजांच्या हाती राहणार होती. शिवाय आदिलशाहीचा जो मुलूख जिंकला जाईल तो शिवरायांना मिळावा म्हणून बादशाला शिफारस करण्याचे मिर्झाराजांनी शिवरायांना सांगितले. शिवराय राजगडावर आले. सर्व फौजेला गोळा होण्यासाठी हुकूम पाठवले गेले. शिवरायांना मिर्झाराजेंचे हे धोरण रुचत नव्हते. पण जोपर्यंत मिर्झाराजे दक्षिणेत होते तोपर्यंत त्यांचे ऐकणे शिवरायांना भाग होते. प्रजेच्या सुखासाठी शिवराय सारे दुःख पचवत होते.  

         ✍  लेखन:- चंदन विश्वासराव पवार 

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा

प्रतिनिधी

या न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close